वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटची तपासणी 

वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटची तपासणी 

कऱ्हाड - रस्त्यावर चालण्यासाठी जी वाहने योग्य नाहीत, त्यांच्यावर कारवाईसह ज्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची (फिटनेस सर्टिफिकेट) मुदत संपली आहे, त्यांचे प्रमाणपत्र निलंबित करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी काढले आहेत. त्यानुसार आता राज्यभर फिटनेस सर्टिफिकेटच्या तपासणीची कार्यवाही सुरू होणार असून, त्याव्दारे कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्याच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथकाचीही स्थापना करण्यात येणार आहेत. त्यामुळे धोकादायक वाहनांमुळे होणारे अपघातही टाळण्यास मदत होणार आहे. 

वाहनधारकांकडून अनेकदा धोकादायक स्थितीतील वाहने रस्त्यावर आणली जातात. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचबरोबर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र असल्याशिवाय वाहने रस्त्यावर चालवू नयेत, असेही आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. त्यासंदर्भातील कार्यवाही होण्यासाठी परिवहन आयुक्तांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार आता जी धोकादायक वाहने आहेत आणि ती रस्त्यावर आणून वापरली जात आहेत, त्यांच्यावर परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्याचबरोबर ज्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपली आहे, त्यांची ती प्रमाणपत्रे निलंबित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ज्या वाहनांकडे ती प्रमाणपत्र नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. त्याच्या कार्यवाहीसाठी स्वतंत्र पथकाचीही निर्मिती करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये ज्या वाहनांकडे संबंधित प्रमाणपत्र आहेत, मात्र ती धोकादायक आहेत, ती वाहने आरटीओकडून दुरुस्ती केंद्रामध्ये अडकवून ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ते वाहन दुरुस्त झाल्यावर संबंधित परिवहन अधिकाऱ्यांकडून संबंधित वाहनमालक वाहन वापरास योग्य असल्याबाबत खात्री करूनच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या वाहनांचे प्रमाणपत्र नूतनीकरणास योग्य आहे, त्यांची पडताळणी करून संबंधित अधिकारी त्यासंदर्भात आदेश देणार आहेत. 

शिस्तभंगाचीही कारवाई  
वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) आणि रस्त्यावर वाहने चालवण्यास धोकादायक आहेत किंवा नाही, याची तपासणी आरटीओकडून नेमण्यात येणाऱ्या विशेष पथकाकडून करण्यात येणार आहे. त्या पथकामार्फत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिलेले आहेत. त्या पथकामार्फत योग्य ती कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिवहन आयुक्तांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com