निरीक्षक गायकवाड लाचप्रकरणी निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

कोल्हापूर - इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव बाबूराव गायकवाडला लाच प्रकरणी निलंबित करण्यात आले. त्याचा सहकारी ठाण्यातील "कलेक्‍टर' पोलिस नाईक विष्णू रमेश शिंदे यालाही आज बडतर्फ करण्यात आले. लाच प्रकरणात शिंदेही सहभागी होता म्हणून ही कारवाई केली. शिंदेप्रमाणेच गायकवाडवरही बडतर्फीची टांगती तलवार कायम आहे. 

कोल्हापूर - इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव बाबूराव गायकवाडला लाच प्रकरणी निलंबित करण्यात आले. त्याचा सहकारी ठाण्यातील "कलेक्‍टर' पोलिस नाईक विष्णू रमेश शिंदे यालाही आज बडतर्फ करण्यात आले. लाच प्रकरणात शिंदेही सहभागी होता म्हणून ही कारवाई केली. शिंदेप्रमाणेच गायकवाडवरही बडतर्फीची टांगती तलवार कायम आहे. 

निरीक्षक गायकवाड व पोलिस नाईक शिंदे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लाच घेतल्याप्रकरणी 26 सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला. त्याच दिवशी त्यांना अटक झाली. त्यांच्या या कृत्यामुळे पोलिस दलाची बदनामी झाली. विष्णू शिंदे हा भ्रष्टाचारी आहे, नैतिक अध:पतनाचे वर्तन असून त्याचे अवैध व्यावसायिकांशी संबंध आहेत. त्यामुळे नागरिकांत पोलिस दलाच्या कार्यपद्धतीबाबत संशय निर्माण झाला. अशा पोलिस कर्मचाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करणे गरजेचे होते. त्यामुळेच निरीक्षक गायकवाडला विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी निलंबित केले तसेच पोलिस नाईक शिंदेला जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बडतर्फ केले. 

दरम्यान, शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील तत्कालीन व पोलिस मुख्यालयात नेमणूक असलेला पोलिस हवालदार कुमार भीमराव पवार याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधाखाली गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने त्याला दोषी ठरवून 2 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास 3 महिने साधी कैद तसेच भारतीय दंडविधान संहिता कलम 201 प्रमाणे नोट गिळून पुरावा नष्ट केल्याबद्दल 1 वर्षाची सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंड व दंड न दिल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा दिली. त्यालाही पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी आज बडतर्फ केले. जे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध भविष्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होईल त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येण्याचे संकेत पोलिस अधीक्षकांनी दिले. 

निलंबित, बडतर्फची प्रेस नोट... 
पोलिसांवर झालेल्या कारवाईला शक्‍यतो पोलिसांकडूनच प्रसिद्धी दिली जात नाही, यासाठी अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा करावी लागते; मात्र निरीक्षक गायकवाड आणि पोलिस नाईक शिंदे यांच्यामुळे वृत्तपत्रांतून मोठ्या प्रमाणात पोलिस दलावर टीका झाली. त्यामुळे आज खुद्द पोलिसांनीच जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत व स्वतः प्रेस नोट तयार करून गायकवाड आणि शिंदे, पवारवर कारवाई केल्याचे प्रसिद्धीस दिले.

Web Title: Inspector Gaikwad suspended