अंधांना डोळस बनवतयं कऱ्हाडचे प्रेरणा दिव्यांग केंद्र 

अंधांना डोळस बनवतयं कऱ्हाडचे प्रेरणा दिव्यांग केंद्र 

कऱ्हाड : ज्यांच्या आयुष्यात जन्मताच अंधार आहे, ज्यांनी जन्मल्यापासून उगवता सुर्यच कधीच पाहिलेला नाही त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याबरोबरच त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी कऱ्हाड (जि.सातारा) येथे प्रेरणा असोशिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या माध्यमातून प्रेरणा दिव्यांग केंद्रामार्फत प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी दोन अंध तरुणांचीच धडपड सुरु आहे. सतीश नवले आणि हणुमंत जोशी अशी त्यांची नावे आहेत. अंधत्वामुळे स्वतःवर जे वाईट प्रसंग आले ते इतर अंध मुलांवर येवु नयेत या उद्दात हेतुने ते दोन तरुण कोल्हापुरहुन कऱ्हाडमध्ये येवुन तब्बल 30 ते 35 विद्यार्थ्यांना संवेदना, अक्षरओळख, संगणक चालवण्याचे मोफत शिक्षण देत आहेत. मोठ्या जिद्दीने त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाला कऱ्हाडमधुन चांगला प्रतिसादही मिळत आहे.

निसर्ग नियमानुसार कुणी कसे जन्माला यावे हे कुणाच्याही हाती नसते. जी मुले जन्मताच अंध जन्माला आली आहेत त्यांची आयुष्य फारच खडतर असते. त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचे त्या कुटुंबासमोर मोठे आव्हानच असते. त्यांच्या आय़ुष्यातील अंधार दुर होवुन त्यांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे या उद्दात हेतुन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या माध्यमातुन प्रेरणा असोशिएशन फॉर ब्लाईंड ही संस्था पुणे येथे कार्यरत आहे. त्या संस्थेमार्फत पश्चिम महाराष्ट्रातील पहिले प्रेरणा दिव्यांग केंद्र या नावाने येथे अंध मुला-मुलींसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. 

त्यासाठी येथील पालिकेने सामाजिक बांधीलकीतुन संबंधित संस्थेला मोफत जागा उपलब्ध करुन दिली आहेत. शहरासह तालुक्यातील 30 ते 35 मुले-मुली त्या केंद्रावर येतात. ती सर्व मुले अंध आहेत. त्यांना स्पर्श आणि आवाजाच्या संवेदनेतुन अंक, अक्षर ओळख करुन देणे, संगणक चालवताना कोणती काळजी घ्यावी, तो कसा हाताळावा, बोटांव्दारे कीबोर्डची ओळख कशी करुन घ्यावी, अंधांसाठी असणारी काठी कशी वापरावी या ना अशा अनेक बाबींचे प्रशिक्षण त्या केंद्रावर दिले जाते. संबंधित मुलांनी गेल्या तीन महिन्यात संगणकाचे बेसीक प्रशिक्षण घेतले आहे. त्याव्दारे ते अंध असुनही संगणकावर स्वतःचे नाव व अन्य माहिती टाईप करु लागले आहेत ही त्यांच्यासाठी मोठी बाब आहे असे सतीश नवले सांगतात. या कामी त्यांना सामाजिक बांधीलकीतुन सुधीर जाधव, अरुण रोकडे, सुनिल शहा, संजय सकुंडे, कुमार पाटील, अॅड. भेदा, सुभाष चरेगावकर हे मदत करत आहेत.

दानशुरांना अशीही साद 

अंध मुले ही शहरासह तालुक्यातील आठ ते दहा किलोमीटर परिसरातुन येतात. त्यासाठी संबंधित पालकांना त्यांना दररोज कऱ्हाड येथील केंद्रावर घेवुन यावे लागते. अशा मुलांच्या पालकांची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्यांना दररोज त्यांना कऱ्हाडला संबंधित मुलांना घेवुन येणे जमत नाही. काही पालक तर आठवड्यातील तीन दिवस मोलमजुरी करुन संबंधित पुन्हा तीन दिवस त्या मुलांना घेवुन सेंटरमध्ये येतात. तर काही पालक हे पैशाअभावी त्या मुलांना घेवुन येण्याचेच टाळत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे समाजातील दानशुरांसाठी अशा अंध मुलांच्या येण्याजाण्याच्या प्रवासाची सोय करण्यासाठीची ही एक सादच आहे.

अंध मुले ही सामान्य व्यक्तीप्रमाणे स्वतःच्या पायावर उभे राहु शकतात, ते नोकरीही करुन स्वतःचे घर चालवु शकतात हे सिध्द करण्याबरोबर त्यांच्यामध्येही असा आत्मविश्वास निर्माण करण्याण्यासाठी आम्ही सचिन तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा दिव्यांग केंद्राच्या माध्यमातुन कार्यरत आहोत. त्याला कऱ्हाडमध्ये चांगला प्रतिसादही मिळत आहे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. 

- सतिश नवले  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com