स्वातंत्र्यवीरांचे सांगली-मिरजेतील प्रेरणादायी क्षण 

Inspirational moments of Sawarkr in Sangli-Miraj
Inspirational moments of Sawarkr in Sangli-Miraj

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर वेगवेगळ्या निमित्ताने 1937 पासून 1944 पर्यंत सांगली-मिरजेत पाचवेळा आल्याच्या नोंदी आढळतात. त्यांचे बंधू बाबाराव सावरकर तर सांगलीतच वास्तव्याला होते. त्यांच्या "अभिनव भारत' या क्रांतीकारी संघटनेचे अनेक अनुयायी इथे सक्रीय होते. त्यांच्या या भेटींचे अनेक कंगोरे आहेत. त्याकाळात त्यांनी सुरु केलेल्या मराठी भाषाशुध्दी मोहिमेचे प्रतिबिंबही या कार्यक्रमांदरम्यान दिसले. या साऱ्या घटनाक्रमांविषयी सांगत आहेत इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर, निमित्त स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीचे. 

रत्नागिरीच्या स्थानबध्दतेतून मुक्तता झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर 20 जून 1937 रोजी मिरजेत आले होते. सत्यवादीकार बाळासाहेब पाटील, संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथपंत लिमये अशी मंडळी त्यांच्या या कार्यक्रम नियोजनात अग्रभागी होती. गुढी उभारून झालेल्या त्यांच्या या स्वागताच्या आठवणी तेव्हा लहान असलेल्या प्रख्यात नट चिंतामणराव कोल्हटकर यांनी लिहल्या आहेत. तेव्हा सायंकाळी मिरज विद्यार्थी संघात त्यांचे भाषण झाले होते. अध्यक्षस्थानी होते कॉंग्रेस नेते बा.वि.शिखरे. जातीभेद पाळू नका, किमान तिरस्कार करू नका असे त्यांनी आवाहन केले होते. वैचारिक मतभेद असून एका व्यासपीठावर येणाऱ्या नेत्यांचा तो काळ होता. स्वातंत्र्यवीरांनी अस्पुष्यता हा हिंदू समाजाला लागलेला कलंक असून तो मिटवण्यासाठी हरिजन सहभोजनाचे जाहीर कार्यक्रम घेतले. त्यांच्या प्रेरणेने सांगलीत सध्याच्या सिध्दार्थ परिसरात स्नेहभोजनाचे कार्यक्रम झाले होते. 

1937 च्या दौऱ्यातच मिरजेतील भानू तालीम आणि अंबाबाई तालीम या दोन संस्थांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. तेव्हा त्यांनी तालीम या शब्दाऐवजी व्यायामशाळा असा शब्दप्रयोग सुचवला होता. त्यांच्या या भाषाशुध्दीच्या मोहिमेची प्रेरणा म्हणूनच मिरजेतील विष्णूपंत कुलकर्णी आणि महादेवशास्त्री गोखले यांनी स्थापन केलेल्या हायस्कूलचे नामकरण त्यांनी "प्रशाला' असे केले. तीच आजची विद्यामंदीर प्रशाला. 

29 ते 31 जुलै 1941 रोजी सावरकर सांगली-मिरजेत चार दिवस मुक्कामी होते. त्यापैकी 30 जुलैला ते सांगलीतील प्रसिध्द गजानन मिलमध्ये गेले होते. मिलचे कर्मचारी मिल मालक विष्णूपंत वेलणकर यांना मालक म्हणायचे. सावरकरांनी मालक हा परकीय शब्द असून त्याऐवजी धनी हा शब्द वापरण्याची सूचना केली. तेव्हापासून वेलणकर यांचा उल्लेख धनी असा होऊ लागला. 

सावरकरांची सांगलीतील आणखी एक अविस्मरणीय भेट म्हणजे 5 नोव्हेंबर 1943 मध्ये झालेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाची. याच महोत्सवात त्यांनी साहित्यकांना "लेखण्या मोडा आणि बंदुका हाती' घ्या असे आवाहन केले. त्या नाट्यसंमेलनात त्यांनी मुकपटानंतर आलेल्या बोलपटांमुळे नाट्यकलेला कोणताही धोका नाही उलट तो नाट्यकलेचा विकासच ठरेल असा आशावाद व्यक्त केला होता. 

या पुर्ण दौऱ्यात त्यांनी हिंदू राष्ट्र सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसाठी प्रबोधन वर्ग घेतले. सांगली नगरपालिकेच्यावतीने त्यांना मानपत्र देण्यात आले. जिल्हा नगरवाचनालयात त्यांनी लोकमान्य टिळकांच्या छायाचित्राचे अनावरण केले. 7 नोव्हेंबरला त्यांनी गाडगीळ सराफांकडे चहापान केले. मुरलीधर मंदिरात हिंदुराष्ट्र दलाच्या कार्यकर्त्यांसाठी भाषण केले. कारखानदार आण्णूकाका भिडे यांच्या घरी भेट दिली होती. भावे नाट्यमंदिरासमोरील त्यावेळच्या जयश्री चित्रपटगृहात त्याकाळी "माझं बाळ' चित्रपट पाहिला होता. या चित्रपटाच्या मध्यंतरावेळी त्यांच्या हस्ते दिग्दर्शक विनायक, लेखक वि.स.खांडेकर, अभिनेते दामुअण्णा मालवणकर यांचा सत्कार झाला होता. या चित्रपटाच्या खेळाचे उत्पन्न राष्ट्रकार्यासाठी सावरकरांकडे सोपवण्यात आले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com