हप्त्याअभावी ऊस उत्पादक अडचणीत

विकास जाधव
बुधवार, 23 मे 2018

काशीळ - जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा हंगाम उलटून दोन ते तीन महिने संपले तरी हजारो शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता मिळाला नसल्याने ते पुरते अडचणीत आले आहेत. ऊस बिले न मिळाल्याने बॅंका, सोसायट्यांची नवी-जुनी कर्जे थांबली आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर व्याजाचा बोजा वाढला असल्याने ऊस बिले जाहीर केल्याप्रमाणे देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

जिल्ह्यात या ऊस गाळप हंगामात १४ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले आहे. गाळप हंगामाच्या सुरवातीस ऊसदराचा तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून कारखानदार व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन एफआरपी अधिक २०० रुपयांप्रमाणे सर्वमान्यता झाली. त्यानंतर ऊस तोडणीस कोयता लागला. या काळात साखरेस दरही चांगले असल्याने अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक २०० रुपये यापेक्षा अधिकतेचा पहिला हप्ता दिला होता. पण, ऊस तुटल्यावर १४ दिवसांत पहिला हप्ता देणे बंधनकारक असते. मात्र, त्याचवेळी साखरेच्या दरात सुरू झालेली घसरण आजही कायम राहिल्याने जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांत गाळप केलेल्या उसाचा पहिला हप्ताच दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ऊस उत्पादक पुरते अडचणीत आले. 

ऊस बिलाद्वारे येणाऱ्या रकमेतून बहुतांश शेतकरी बॅंका, सोसायट्यांच्या कर्जाची नवी-जुनी प्रकरणे केली जातात. मात्र, अनेक कारखान्यांकडून पहिला हप्ता अदा न झाल्याने शेतकऱ्यांची कर्जांची स्थिती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च राहिली आहे.

विक्रमी गाळप... 
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले असल्याने जिल्ह्यात गाळपाचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात कधी नव्हे ती एक कोटी क्विंटलवर साखरनिर्मिती झाली आहे. अनेक कारखान्यांनी उद्दिष्टांपेक्षा ५० हजार ते एक लाख मेट्रिक टन अधिकतेचे गाळप केले आहे. पण, ढासळत्या दरांअभावी कारखान्यांमध्ये ती साखर पडून आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या बिलांवर झाला आहे. 

Web Title: installment Sugarcane Manufacturer problem