सांगलीत लाकडाऐवजी आता पाला पाचोळ्यातून होणार अंत्यसंस्कार  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

लाकूड तसेच टायरीला हे पर्याय असून, अंत्यसंस्कारासाठी प्रती माणशी 2 हजार 450 रुपये खर्च येतो. तो 1 हजार 800 रुपयांवर येणार आहे, अशी माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली.

सांगली - अत्यंसंस्कारासाठी वृक्षतोड आणि प्रदूषणाला फाटा देत आता लाकडाऐवजी पाला पाचोळ्यासह अन्य टाकाऊ वस्तूंचा वापर करुन मोक्षकाष्ट वापराचा स्तुत्य उपक्रम महापालिकेने सुरू केला. लाकूड तसेच टायरीला हे पर्याय असून, अंत्यसंस्कारासाठी प्रती माणशी 2 हजार 450 रुपये खर्च येतो. तो 1 हजार 800 रुपयांवर येणार आहे, अशी माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली. ते म्हणाले, 'सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात अंत्यसंस्कारासाठी वार्षिक 70-80 लाख रुपये खर्च होतात. त्यासाठी लाकूड, टायर, रॉकेल आदींचा वापर केला जातो. वास्तविक यामुळे पर्यावरणाची हानी होते. प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. याला पर्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्यानुसार मूळच्या सांगलीच्या व नागपूर येथील विजय लिमये यांनी मोक्षकाष्टचा दिलेला पर्याय सर्वोत्तम असल्याचे दिसून आले.'

माहिती आयुक्त पुढे म्हणाले, 'सध्या अंत्यसंस्कारासाठी 300 किलो लाकूड, तीन-चार लिटर रॉकेल, टायर असा सुमारे 2450 रुपयांचा खर्च येतो. परंतु 200 किलो मोक्षकाष्टमधून अंत्यसंस्कार होऊ शकतात. त्यासाठी केवळ 1800 रुपये खर्च येतो. याची आज अमरधाम स्मशानभूमीत चाचपणी करण्यात आली. नागरिकांनीही त्याला प्रतिसाद दिला. लाकडाचा वापर करून केलेल्या अंत्यसंस्कारातून 4 हजार कॅलरीपेक्षा अधिक प्रदूषण होते. पण मोक्षकाष्टमधून प्रदूषण होत नाही. त्यासाठी टायर वापराव्या लागत नाहीत. सध्या यासाठी 20 टन मोक्षकाष्टचा साठा मागविला आहे. सध्या नागपूरहून साठा मागविल्याने अधिक खर्च होतो. पण त्याची निर्मिती सांगली, मिरजेसह आसपासच्या खेडेगावात झाली तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. पर्यावरण संरक्षणाचेही काम होईल. यासाठी आम्ही प्रयत्न करू.' 

मोक्षकाष्ट काय?  
आयुक्त खेबुडकर म्हणाले, "मोक्षकाष्ट म्हणजे उद्यानातील पाला-पाचोळा, सुका कचरा, उसाचा पाला, भाताचे पिंजार, सोयाबीन, तुरीच्या काटक्‍यांसह विविध प्रकारच्या टाकाऊ पदार्थाचा चुरा मशिनद्वारे केला जातो. त्याचा चुरा प्रेस करून त्याचे ठोकळे तयार केले जातात. त्याला मोक्षकाष्ट असे नाव दिले आहे. ते लाकडापेक्षा चांगले ज्वलनशील आणि प्रदूषणमुक्त असतात.'' 

Web Title: Instead of wood funeral will be done from dispatch leaves in Sangli