शक्ती पणाला लावू, भाजपला घरी घालवू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या निवडणुकीत घरी पाठवू. त्यासाठी देशातील इंटक कामगार शक्ती पणाला लावतील. शाहू मिल जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे स्मारकच होईल, असे दोन महत्त्वपूर्ण ठराव आज इंटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मांडले. ‘इंटक’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी अध्यक्षस्थानी होते.

कोल्हापूर - कामगार विरोधी कायदे करून कामगारांच्या जगण्याचे हक्क भाजप सरकारने हिरावले, अशा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या निवडणुकीत घरी पाठवू. त्यासाठी देशातील इंटक कामगार शक्ती पणाला लावतील. शाहू मिल जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे स्मारकच होईल, असे दोन महत्त्वपूर्ण ठराव आज इंटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मांडले. ‘इंटक’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी अध्यक्षस्थानी होते.

सर्वाधिक कामगार संख्येच्या इंटक कामगार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शाहू सांस्कृतिक मंदिरात झाले यावेळी हे ठराव मांडले. इंटकचे राज्याध्यक्ष जयप्रकाश छाजेड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी विचार मांडले. महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.  

 ‘‘गेल्या चार वर्षांत भाजप सरकारने बहुतांशी कामगार कायदे मोडीत काढले. वीज वितरण कंपनी, एसटी महामंडळ असो वा खासगी क्षेत्रातील कामगारांचे जगणे हिरावले. त्यांना कामगारांच्या दोन कोटी मतांची ताकद दाखवावी लागेल.’’ 

- जयप्रकाश छाजेड

प्रकाश आवाडे म्हणाले, ‘‘दोन कोटी लोकांना रोजगार देतो, असे सांगत भाजप सरकार सत्तेत आले; पण ते आल्यानंतर एक कोटी २० लाख लोकांचे रोजगार गेले. औद्योगिक वसाहतीतील ४० टक्के कारखाने बंद आहेत. कामगारांनी आता सत्ताधाऱ्यांना घरी घालवण्याची वेळ आली आहे.’’ 

‘‘मोदी सरकारने बड्या उद्योजकांचे गुलाम बनल्यासारखे कामगार विरोधी धोरणे राबवली आहेत. म्हणून हे सरकार घालवावे लागेल.’’   

- डॉ. संजीवा रेड्डी

काँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल, इंटकचे सरचिटणीस के. के. नायर, गोविंद मोहिते, नगरसेवक तौफिक मुल्लानी, नंदाताई भोसले, एस. के. झामा, दिवाकर दळवी यांचे मनोगत झाले. यावेळी गुलाबराव घोरपडे, कामगार नेते विठ्ठलराव मोहिते, शामराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शाहू मिलच्या जागी स्मारकच 
कोल्हापूर शाहू मिलच्या जागेवर अनेकांचा डोळा आहे. ती जागा इतर कोणत्याही कारणासाठी वापरू नये, तिथे राजर्षी शाहू महाराजांचे स्मारकच होईल, रोजगार प्रशिक्षण केंद्र तिथे सुरू करता येईल; पण उद्योगाला मिलची जागा देऊ नये, यासाठी आम्ही प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या दारात उपोषण करू, असेही प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

किमान वेतन ५० हजार हवे  
देशभरातील कामगार संघटनांची केंद्रीय समिती तयार केली आहे. यापुढील काळात कामगारांना किमान ५० हजार रुपये वेतन मिळावे, रोजगार शाश्‍वती द्यावी, कामगारांच्या प्रतिनिधीला विधानसभेत स्थान द्यावे, कंपनीच्या नफ्यात कामगारांना वाटा द्यावा, अशा मागण्या नव्याने सत्तेत येणाऱ्या पक्षाकडे करणार असल्याचे डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intak worker organisation conference