आंतरजातीय विवाहांमुळे वाढतोय सामाजिक सलोखा! 

solapur
solapur

सोलापूर : सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने आंतरजातीय विवाहांना महत्त्व आहे. वेगवेगळ्या जातीतील तरुण आणि तरुणीचा विवाह झाल्यास समाजातील तेढ दूर होऊन समाज एकसंध होण्यास बळ मिळते. अनेकांनी धाडसाने आंतरजातीय विवाह करून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला आहे. ज्याप्रमाणे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात त्याचप्रकारे जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाह सोहळ्यांचे आयोजन केल्यास या चळवळीला गती येईल, असे मत काहींनी नोंदविले आहे. 

जातीय तेढ कमी होऊन सामाजिक सलोखा वाढला पाहिजे, याच अनुषंगाने "सकाळ'ने आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणाईशी संवाद साधला. ""समाजाने प्रत्येक गोष्टीत जात पाहण्यापेक्षा माणसाचे कर्तृत्व पाहिले पाहिजे. जात, धर्म पाहण्यापेक्षा कर्तृत्ववान-अकार्यक्षम, आशावादी- निराशावादी, नीतिमान-अनीती या जाती असाव्यात तरच आपण सर्व महापुरुषांना अभिप्रेत असणारा देश घडवू शकतो. प्रेमात पडल्यावर समाजाने मुला-मुलीची जात पाहण्यापेक्षा ते दोघे एकमेकांसोबत किती सक्षमपणे आयुष्य घालवू शकतात हे पाहावे'' असे मत अक्षया बनसोडे यांनी मांडले. 

लग्नाच्या गाठी देव बनवतो हे मी त्याचवेळी मान्य केले, नाहीतर कोल्हापूरच्या मुलाचा प्रेमविवाह 400 किमी दूर मुंबईमध्ये राहणाऱ्या मुलीसोबत कसा झाला असता. आपल्या जातींमधील मुलासोबतच लग्न कर नाहीतर कुटुंबासोबत कायमचा संबंध तोडण्याची धमकीही आम्हाला दिली होती. पण आमच्या प्रेमाचा विजय झाला. दोन कुटुंब एकत्र झाले. समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाहांची संख्या वाढावी, असे मत अमर कांबळे यांनी व्यक्त केले. 

जातिव्यवस्थेच्या निर्मूलनाचा एक प्रभावी उपाय म्हणून आंतरजातीय विवाहांकडे पाहायला हवे. दीपा आणि माझी ओळख हॉस्पिटलमध्ये झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. भेटी होत गेल्या आणि आम्ही विवाह करून आयुष्यभर साथ राहण्याचा निर्णय घेतला. पळून जाऊन परिवाराची मान खाली घालायची नव्हती. कुटुंबीयांच्या परवानगीने लग्न करण्याचे ठरविले. अनेक अडचणी आल्या. मुलीचे कुटुंबीय लग्नास तयार नव्हते. तिच्या आईने आमच्या प्रेमापोटी विरोधाला न जुमानता लग्नाला तयारी दर्शविली आणि कोर्टात लग्न लावून दिले. समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हायला हवा. 
- अमर कांबळे, झोन को-ऑर्डिनेटर, मिटकॉन 

सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने आंतरजातीय विवाहांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामाजिक सलोखा राखायचा असेल तर जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाहांचे प्रयत्न व्हायला हवेत. जसे सामुदायिक विवाह सोहळे होतात त्याच पद्धतीने आंतरजातीय विवाह सोहळेही व्हावेत. जशा इतरांना अडचणी येतात तशाच आम्हालाही आल्या. सामंजस्याने विचारपूर्वक कुटुंबीयांना पटवून दिल्यास मार्ग निघतो. अडचणी तर येणारच. पूर्वापार चालत आलेली विचारसरणी एका रात्रीत बदलणार नाही. कोणताही निर्णय घेताना चुकीचे पाऊल उचलू नका. 
- दीप्ती इंगळे-सिद्धम, शिक्षिका, वि. मो. मेहता प्रशाला 

समाजात सलोखा राहण्यासाठी आंतरजातीय विवाह महत्त्वाचे आहेत. आंतरजातीय विवाहांमुळे वेगवेगळ्या समाजातील संस्कृती, रीतीरिवाजांची मिसळ होऊन एक वेगळीच संस्कृती निर्माण होते. आम्ही प्रेमात पडल्यावर दोन महिन्यांनी आम्हाला आमची जात वेगवेगळी असल्याचे लोकांकडून कळले. आम्ही कधीच जातीचा विचारही केला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवलंबलेल्या व डॉ. बाबासाहेबांनी संविधानात मांडलेल्या समानता या तत्त्वावर विश्‍वास ठेवून भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून वंचित घटकातील मुलांच्या सानिध्यात आम्ही लग्न केले. 
- अक्षया आरोटे-बनसोडे, संचालक, 360 एक्‍सप्लोरर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com