पाच महिन्यानंतर "लालपरी' सीमा ओलांडणार....20 पासून आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक

घनश्‍याम नवाथे
Wednesday, 19 August 2020

सांगली-  "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदीमुळे 23 मार्चपासून बंद असलेली एसटी बसेसची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक गुरूवार (ता..20) पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाच महिन्यानंतर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून लालपरी धावणार आहे. प्रवाशांना कोणत्याही ई-पासची सक्ती राहणार नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

सांगली-  "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदीमुळे 23 मार्चपासून बंद असलेली एसटी बसेसची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक गुरूवार (ता..20) पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाच महिन्यानंतर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून लालपरी धावणार आहे. प्रवाशांना कोणत्याही ई-पासची सक्ती राहणार नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर मार्च 2020 महिन्यात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात 15 मार्चपासून टप्पाटप्प्याने तर 23 मार्चपासून एसटी बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. जिल्हा, आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासी वाहतूक बंद झाली. दरम्यान मे महिन्यात एसटीने परप्रांतिय मजूर, विद्यार्थी आदींना सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी आंतरराज्य सेवा दिली. 22 मे पासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू आहे. प्रत्येक सीटवर एकच प्रवासी याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मुळ प्रवासी दरात सध्या प्रवासी वाहतूक तोट्यातच सुरूच आहे. 

गेल्या काही दिवसापासून प्रवाशांना आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू होण्याची प्रतिक्षा होती. त्यानुसार परिवहन मंत्री अनिल परब यांना आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून टप्प्याटप्प्याने शेजारील जिल्ह्यात एसटी बसेस सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी मुळ प्रवासी दर आकारला जाणार आहे. तसेच प्रवाशांना ई-पासची आवश्‍यकता भासणार नाही. बसे सेवा सुरू करताना ज्या मार्गावर प्रवासी संख्या चांगली असेल तिथे वाहतुकीचे नियोजन करावे असे निर्देश वाहतूक महाव्यवस्थापक यांनी दिले आहेत. सांगलीतून कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यात प्रवासी उपलब्ध असतील त्यानुसार टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू केली जाईल. साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी या गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. जिल्ह्यातून पुणे मार्गावरही वाहतूक करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. 
दरम्यान आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेजारील जिल्ह्यात नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या नोकरदारांसह हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र त्यासाठी कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनांचे पालन करावे लागणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inter-district passenger transport after five months