झेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार 

सूर्यकांत बनकर
शनिवार, 15 डिसेंबर 2018

करकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक इंनोव्हेंटिव्ह एज्युकेटर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ ते २७ मार्च या कालावधीत शिकागो येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

करकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक इंनोव्हेंटिव्ह एज्युकेटर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ ते २७ मार्च या कालावधीत शिकागो येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

 नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची एक्सप्लोलर फेलोशिप, प्रमाणपत्र  व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 'जैवविविधता व पर्यावरण संरक्षण' याकरिता तंत्रज्ञान वापरून जगभरातील मुलांमध्ये  पर्यावरण संरक्षणविषयक जाणीव जागृती निर्माण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  जगातील २८ देशांतील ९० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यामध्ये भारतातील तीन जणांचा समावेश आहे. यामध्ये  एस सुब्रमण्यम (केरळ) आणि झेनमयी नेगी (राजस्थान) यांच्यासह महाराष्ट्रातून परितेवाडी (ता.माढा) येथे एक ते चार च्या शाळेवर कार्यरत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील रणजीत डिसले या एकमेव प्राथमिक शिक्षकाचा समावेश आहे. 

डिसले यांनी राबवलेल्या 'अराउंड द वर्ल्ड' या प्रोजेक्टकरिता त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यांमध्ये आकुंभे (ता.माढा) गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची निवड करण्यात आली होती. याअंतर्गत गावाचे एनव्हायरमेंट रिपोर्ट कार्ड तयार करून पर्यावरणदृष्टीने अधिक समृद्धता आणण्यासाठी व्यापक कृती कार्यक्रम राबवला गेला. गावातील एकूण झाडांची संख्या, गावचे एकूण क्षेत्रफळ, दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या, आदी माहिती संकलित करून ३३ टक्के वन क्षेत्र निर्माण करण्यासाठी  तंत्रज्ञान वापरण्यात आले. गावातील जुन्या झाडांची कत्तल होऊ नये याकरिता त्या झाडांवर QR कोड टॅग लावण्यात आले. जेणेकरून ते झाड तोडण्याचा प्रयत्न केला असता 'रेड अलर्ट मेसेज' विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर जात आहे.

गावातील मुले अशा झाडाचा शोध घेऊन त्या व्यक्तीला पाच रोपे देऊन ती लावायला व जोपासायला लावत असत. या कृती कार्यक्रमामुळे गावातील  २६ टक्के असणारे वन क्षेत्र मागील पाच वर्षांत ३३टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकातील ज्ञान व  दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानात  मुलांनी विशेष कल दाखवला.

मागील वर्षी सदर उपक्रम व्यापक स्वरूपात रावबला गेला असून यामध्ये रशिया, इटली व फिनलँड मधील शाळांनी सहभाग नोंदवला आहे.

यापूर्वीही रणजितसिंह डिसले यांना मायक्रोसॉफ्टच्या वतीने दिला जाणारा 'मायक्रोसॉफ्ट इंनोव्हेंटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट' हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सलग चार वेळा मिळाला असून त्यांनी तयार केलेल्या क्यू आर कोडेड पाठ्यपुस्तकाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची जगातील तीनशे इंनोव्हेंटिव्ह प्रोजेक्ट मध्ये निवड झाली आहे. कॅनडातील टोरोंटो येथे झालेल्या जागतिक परिषदेत त्यांनी हा प्रोजेक्ट सादर केला असून जगातील अकरा देशांतील शाळांमध्ये याची अंमलबजावणी होण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. आज डिसले यांनी तयार केलेली क्यू आर कोडेड पुस्तके महाराष्ट्रातील ६० लाखांहून अधिक विद्यार्थी वापरत असून पुढील वर्षापासून देशातील सर्वच पाठ्यपुस्तके क्यू आर कोडेड असतील.

रणजीत डिसले- हा पुरस्कार जिल्हा परिषेदेच्या सर्व शिक्षकांच्या वतीने मी आदरपूर्वक स्वीकारत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा सामाजिक दर्जा व आदरभाव निश्चितच वाढेल. तंत्रज्ञानाच्या वापरातून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी हा शैक्षणिक प्रयोग अनुकरणीय आहे. याची व्यापक स्वरूपात अंमलबजावणी करण्यासाठी शाळांनी पुढाकार घेतला तर हरितग्राम संकल्पना प्रत्यक्षात साकारली जाईल, असा विश्वास वाटतो.

Web Title: International award to ZP Teacher