दारूगोळा जप्‍त प्रकरणः एसआयटीचे पथक कोल्हापुरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - घातपात घडविण्याच्या तयारीतील संशयित शरद कळसकरच्या वास्तव्याबाबतची माहिती घेण्यासाठी एसआयटीचे एक पथक कोल्हापुरात ठाण मांडून आहे. पथकाकडून वास्तव्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. औद्योगिक वसाहतीतही चौकशी करण्यात येत आहे.

कोल्हापूर - घातपात घडविण्याच्या तयारीतील संशयित शरद कळसकरच्या वास्तव्याबाबतची माहिती घेण्यासाठी एसआयटीचे एक पथक कोल्हापुरात ठाण मांडून आहे. पथकाकडून वास्तव्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. औद्योगिक वसाहतीतही चौकशी करण्यात येत आहे. कॉल डिटेल्स्‌च्या आधारे माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कोल्हापुरातील एक पथक पुण्याला रवाना झाले असल्याचे सूत्रांकडून समजते. 

राज्यातील महानगरामध्ये घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या वेगवेगळ्या संघटनेच्या तीन सदस्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दोन दिवसांपूर्वी अटक केली. त्यातील संशयित शरद कळसकरने कोल्हापुरात टर्नरचे प्रशिक्षण काम केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली. याबाबतची इत्थंभूत माहिती संकलित करण्यासाठी एसआयटीचे एक पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे.

एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचे पथक आहे. त्यांच्याकडून कळसकरच्या कॉल डिटेल्स्‌वरून तो कोणाकोणाच्या संपर्कात होता, याची माहिती घेतली जात आहे. तो टर्नरचे काम करत असल्याने शहर व परिसरातील औद्योगिक वसाहतीतही या पथकाने चौकशी केली. तो ज्याठिकाणी वास्तव्यास होता, त्या परिसरातून त्याच्या वर्तनासंबंधीचीही माहिती संकलित केली जात आहे. काही संघटनेच्या कार्यकर्त्यांचीही चौकशी या पथकांकडून गोपनीयरीत्या केल्याचे समजते.

दरम्यान, पानसरे हत्येशी संबंधित काही धागेदोरे मिळतात काय, याची माहिती घेण्यासाठी कोल्हापुरातील एक पथक जिल्ह्यासह सांगली, सातारा येथे लक्ष ठेवून आहे. त्याचबरोबर काही अधिकारी तपासासाठी पुण्यालाही गेल्याचे समजते.

कळसकरने मोबाईल वापरणे दिले सोडून
दौलताबाद (जि. औरंगाबाद) - दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या केसापुरी येथील शरद कळसकर याने दोन वर्षांपासून मोबाईल वापरणेच सोडून दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. 

त्याचा मित्र ज्ञानेश्‍वर सुराशे यांनी सांगितले, ‘‘शरदला राजकारणाची आवड नव्हती. गावातील दोन्ही राजकीय गटांबाबत तो तटस्थतेचे धोरण ठेवायचा. तो म्हणायचा की, या दोन्ही राजकीय गटांचे लोक त्याच्या कुटुंबीयास आपल्या गटात ओढण्यासाठी माझ्याशी मोबाईलद्वारे कायम संपर्क करायचे. त्यांना कंटाळून मी दोन वर्षांपासून मोबाईल वापरणेच सोडून दिले.’’

दरम्यान, कळसकरच्या अटकेनंतर  केसापुरी  प्रकाशझोतात आले. गावातील कोणीच बोलायला तयार नाही. शरदच्या आई-वडिलांना अनेक प्रश्‍न विचारण्यात येत आहेत; मात्र ते ‘आमचा मुलगा अशा कृत्यात सहभागी असूच शकत नाही,’ एवढेच उत्तर देत आहेत. रविवारी पहाटेच पोलिस येणार असल्याची चर्चा होती; परंतु कोणीही चौकशीसाठी आले नाहीत.

Web Title: for investigation of Ammunition seized case SIT team in Kolhapur

टॅग्स