"आयसीएमआर'च्या पथकाकडून जिल्ह्यात तपासणी : 400 रक्ताचे नमुने घेतले

corona new logo.jpg
corona new logo.jpg

सांगली- भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या (आयसीएमआर) पथकाने जिल्ह्यातील दहा ठिकाणी भेट देऊन 400 नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. आयजीजी एलिझा चाचणीसाठी चेन्नईतील प्रयोगशाळेला हे नमुने पाठवण्यात येणार आहेत. यातून कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेडिंग होऊन गेले आहे का? याची माहिती मिळणार आहे. 
आयसीएमआरने राज्यातील सहा जिल्ह्यांतील नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. तसेच मुंबई आणि पुणे या हायरिस्क ठिकाणांचेही रक्ताचे नमुने घेतले आहेत. राज्यातून निवडलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली यांचा समावेश होता. 


सांगलीत कोरोनाचे प्रमाण कमी असल्याने येथील नागरिकांच्या रक्ताच्या नमुन्याची चाचणी घेण्यात येणार आहे. या पथकाने सांगली जिल्ह्यातील दहा ठिकाणांची निवड केली होती. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे असलेली नेर्ले, बागणी, कवठेपिरान, खेराडे वांगी, खरसुंडी आणि आरग ही गावे, ग्रामीण रुग्णालये असलेली आष्टा आणि माडग्याळ, तर महापालिका क्षेत्रातील प्रभाग नऊ आणि अठरामधील आरोग्य केंद्रे यांचा समावेश होता. 
या पथकाला जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. सतीश घाटगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी, तसेच संबंधित ठिकाणचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सहकार्य केले.

प्रत्येक गावातील 40 घरे निवडून त्यामधील एकाच व्यक्तीचे रक्त घेण्यात आले. असे एकूण दहा ठिकाणच्या 400 नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतले. त्यांचे दोन भाग करून एकूण 800 नमुने करण्यात आले. या रक्तातील अँटीबॉडिजमधील आयजीजी चाचणी घेण्यात येणार आहे. एक नमुना हेमोलाईज झाल्याने तो वगळण्यात आला. त्यामुळे एकूण 798 नमुने जिल्हा परिषदेच्या व्हॅक्‍सिन स्टोअरमध्ये उणे 20 अंश सेल्सिअस तापमानात ठेवले आहेत. हे सर्व नमुने चेन्नई येथील आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत आयजीजी एलिझा चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. यामुळे सांगलीत कम्युनिटी स्प्रेडिंग झाले आहे की नाही, याची माहिती समोर येणार आहे. या चाचणीचे अहवाल येण्यास सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. 

सांगलीच्या टीमचे कौतुक 
आयसीएमआरच्या पथकाने सांगलीत तपासणीसाठी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि डॉ. ऋषिकेश आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. सुजाता जोशी, डॉ. सतीश घाटगे यांनी केलेल्या नियोजनाबद्दल कौतुक केले. अनेक ठिकाणी नागरिक स्वत: आमचे रक्त तपासणीसाठी घ्या म्हणून तयार झाले. हा अनुभव पथकासाठी आश्‍चर्यकारक होता, असे आयसीएमआरचे डॉ. शहनारा, दीप्ती बिनॉय यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com