जप्त पिस्तुलांचा तपास गुलदस्त्यातच ; कऱ्हाडाला गुंड सुसाट

सचिन शिंदे
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

...अशी आहे वस्तुस्थिती 

 पोलिसांकडून पिस्तुलाच्या तस्करीचाही तपास कमी अन्‌ जप्तीचा गवगवा जास्त 
 सामान्यांना संशयितांच्या कंबरेला दिसणाऱ्या पोलिसांना मात्र दिसत नाहीत 
 पिस्तूल तपासाचे वर्तुळ पोलिसांकडून कधीच पूर्ण होत नाही 
 पोलिसांनी पारंपरिक तपासाची पद्धत बंद करून थेट कारवाई करावी 
 आर्म ऍक्‍टनुसार दाखल होणाऱ्या गुन्ह्यांतील कागदही स्ट्रॉंग करावेत 

 

कऱ्हाड ः पिस्तूल जप्त तर होतेय, मग ते तस्करीच्या माध्यमातून आलेले असेल किंवा गुन्ह्यांत वापरलेले असेल, त्याचा तपास मात्र काहीही होत नाही. जप्तीच्या कारवाईचा गवगवा पोलिस खूप करतात. मात्र, ते पिस्तूल आले कोठून, त्याचे मूळ कुठे आहे, याचा तपास होताना दिसत नाही. 

शहरातील वेगवेगळ्या गुंडांच्या टोळ्यांकडून दहा वर्षांत वेगवेगळ्या गुन्ह्यांत आजअखेर वापरलेली सुमारे 45 पिस्तुले पोलिसांनी जप्त केली. 2009 पासून कऱ्हाडला वेगळी स्थिती दिसते. त्यामुळे त्या टोळ्यांकडून वेगवेगळी पिस्तुले जप्त झाली. त्यात ऍटोमॅटिक पिस्तूल, गावठी कट्टा, रिव्हॉल्वर जप्त झाल्या आहेत. मात्र, त्याचा तपास "रामभरोसे' दिसतो आहे. आजवर एकाही पिस्तुलाचा तपास शेवटच्या टोकापर्यंत पोलिसांनी नेलेला नाही. गुंडांच्या टोळ्यांना इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, मुंबई भागातून पिस्तुले पुरवली गेली. माजी सैनिकाकडे असतात, त्या पिस्तूल गुंडांच्या टोळ्यांनी गुन्ह्यात वापरल्या आहेत. त्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अटक संशयिताने दिलेला जबाब अंतिम समजून पिस्तूल तपास गुंडाळला जातो आहे. पवन सोळवंडेवर ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या गेल्या, ते जप्त झाले. मात्र, ते कोठून उपलब्ध केले, त्याचा तपास ठरलेल्या पठडीतूनच होणार आहे. मृत संशयिताचे नाव संबंधित संशयित घेणार. पोलिसही तेच अंतिम व ब्रह्मसत्य मानून तो तपास थांबविणार. त्या टोळ्यांचा आदर्श घेवून कऱ्हाडात त्याच्या विरोधातील टोळ्या त्याच मार्गाने पिस्तूल कऱ्हाडला आणणार. हे चक्रच चालूच राहणार आहे. ते बंद पाडायचे असेल तर पोलिसांना मुळावर घाव घालावाच लागेल. गुंडांच्या टोळ्यांशिवाय दहा वर्षांपासून पोलिसांनी शहरात तस्करीसाठी आलेल्या अनेक संशयितांच्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. त्या टोळ्यांकडून जप्त झालेल्या सुमारे 45 पिस्तुलांचा त्यात समावेश आहे. गावठी कट्ट्यापासून ऍटोमॅटिक पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. 25 हून अधिक लोकांना त्यावेळी अटकही झाली होती. मात्र, त्याचाही तपास पोलिसांनी पूर्णत्वाकडे नेलेला नाही. 

परराज्यातील कनेक्‍शन 

गुंडांच्या टोळ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पिस्तुलांचे कनेक्‍शन परराज्यापर्यंत जाते. याची अनेकदा चर्चा झाली. मात्र, पोलिसांचा तपास मात्र कधीही तिथपर्यंत पोचला नाही. गुंडांच्या टोळ्यांना इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, मुंबई भागातून पिस्तुले पुरवली जातात. त्या व्हाया कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, बिहार व उत्तर प्रदेशातून येतात. कधी तरी राजस्थानचेही नाव घेतले जाते. ही कडी जुळविण्याचे कष्ट पोलिसांनी कधीच घेतले नाहीत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigation of seized pistols kept yet secret