धक्कादायक ! अधिकारीच करतात गुन्हेगारांना मदत ?

Investigation Of Three Officers Of Kalamba Jail Starts
Investigation Of Three Officers Of Kalamba Jail Starts

कोल्हापूर - ‘मोका’ अंतर्गत गुन्ह्यातील संशयितांना मदत केल्याचे प्रकरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भोवणार आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत, जिल्हा पोलिस दलाकडून कळंबा कारागृहातील १५ कर्मचाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली आहे. त्यांत तीन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची झालेली तडकाफडकी बदली हा त्याचाच एक भाग असल्याची चर्चा सुरू आहे. 

यादवनगरातील संशयित सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर ८ एप्रिलला प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांनी छापा टाकला. मुल्लाच्या साथीदारांनी शर्मा यांच्यासह त्यांच्या पथकावर हल्ला केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाने मुल्लासह त्याच्या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई केली. या प्रकरणाचा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सखोल तपास केला. त्यांनी मुल्लाचे मुंबईतील साथीदार अग्रवाल, सावलासह सम्राट कोराणे आदी ४४ संशयितांवर मोकाअंतर्गत कारवाई केली. त्या सर्वांविरोधात पुण्याच्या विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्रही सादर केले. या प्रकरणातील ४२ संशयितांना अटक केली. सध्या ते कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

नातेवाइकांच्या भेटीदरम्यान कारागृहात सहकार्य

मोकाअंतर्गत कारवाई झालेल्या संशयितांना शोधून काढून, जेरबंद करणे, त्यांच्यावर दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पोलिस प्रशासनाला चांगलीच मेहनत घ्यावी लागते; मात्र कारागृहात संबंधित संशयितांपैकी काही जणांना नातेवाइकांच्या भेटीदरम्यान कारागृहात सहकार्य केले जाते. त्यांना खाद्यपदार्थांसह इतर सवलती दिल्या जातात. अशा प्रकारची पोलिस प्रशासनाकडून वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची तातडीने वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली.

शेळके यांची तडकाफडकी बदली

याप्रकरणी कारागृहातील १५ कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. यात तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या चौकशीच्या पार्श्‍वभूमीवर अधीक्षक शरद शेळके यांची पुणे येरवडा तुरुगांधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात तडकाफडकी बदली झाली. ही बदली याच चौकशीचा एक भाग मानला जात आहे; पण याबाबत शेळके यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने या बदलीमागचे नेमके हेच कारण आहे काय, हे समजू शकले नाही. 
यापूर्वीही कारागृहात कैद्यांनी केलेली गांजा पार्टी, न्यायालयीन बंदी संतोष पोळ याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणाचीही चौकशी झाली होती. आता नव्याने सुरू झालेल्या या चौकशीमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com