इरोम शर्मिला यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

मार्तंडराव बुचूडे
शुक्रवार, 11 मे 2018

राळेगणसिद्धी (नगर) : मणिपूरमध्ये सैन्य बलाच्या अन्यायकारक कायद्याच्या विरोधात 16 वर्षे उपोषण केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी आज राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. मणिपूरमध्ये शर्मिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्या सध्या तमिळनाडु येथे रहातात.     

राळेगणसिद्धी (नगर) : मणिपूरमध्ये सैन्य बलाच्या अन्यायकारक कायद्याच्या विरोधात 16 वर्षे उपोषण केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी आज राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. मणिपूरमध्ये शर्मिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्या सध्या तमिळनाडु येथे रहातात.     

शर्मिला यांनी हजारे यांना संगितले की, माझा संघर्ष या पुढेही सुरू रहाणार आहे. त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. यावेळी हजारे यांनी माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. हजारे म्हणाले , त्यांच्या उपोषण काळातही आपण त्यांना समर्थन दिले होते. समाजाच्या हितासाठी शर्मिला सारखे लोक पूर्ण वेडे होऊन काम करतात, अशा समर्पित कार्यकर्त्यांची देशाला गरज आहे.

आंदोलनात यश अपयश येतच असते. मात्र आपण जिवनात नैराश्य येऊ द्यायचे नसते. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करताना मलाही खूप त्रास झाला. जेलमध्ये जावे लागले. धमक्यांना सामोरे जावे लागले. पण अशा वेळी तुम्हाला डगमगून चालत नाही. तरच तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकता. त्यासाठी निर्भय होऊन निष्काम भावनेने कार्य सुरू ठेवावे. 

हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीस आपले नेहमीच सक्रीय समर्थन असेल असेही शर्मिला यांनी सांगितले. मणिपूर हे आजही विकासापासून वंचित असून तिथे सामान्य लोकांवर सातत्याने अन्याय होत आहे. तिथे साधे रस्तेही नाहीत त्या साठी हजारे यांनी एकदा मणिपूरमध्ये यावे अशी विनंती त्यांनी केली. आपण समर्पित भावनेने समाजाच्या हितासाठी काही करत असताना लोक मात्र उदासिन असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

16 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यात आपल्याला सुरुवातीस लोकांचा पाठिंबा मिळाला. पण हळूहळू तो कमी होत गेला. त्यामुळे तिथे एक व्यापक जनआंदोलन उभे राहू शकले नाही. आज मी भरकटलेली सामान्य कार्यकर्ती आहे. पण समाजासाठी मला काहीतरी करायचंय. त्याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी मी अण्णांकडे आले आहे असे शर्मिला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.   

Web Title: irom sharmila meets anna hajare in ralegansiddhi