जिल्ह्यात ठिबक सिंचनाचे १८ कोटी अनुदान जमा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

सन २०१३-१४ व २०१६-१७ मधील शेतकऱ्यांचा समावेश
काशीळ - सातारा जिल्ह्यातील ठिबक संचांचे २०१३-१४ मधील रखडलेले व २०१६- १७ मध्ये बसविलेल्या शेतकऱ्यांचे १८ कोटी ३१ लाख रुपये 
अनुदान कृषी विभागाकडे जमा झाले आहे. हे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ‘आरटीजीएस’द्वारा जमा करण्याचे काम सुरू आहे. 

सन २०१३-१४ व २०१६-१७ मधील शेतकऱ्यांचा समावेश
काशीळ - सातारा जिल्ह्यातील ठिबक संचांचे २०१३-१४ मधील रखडलेले व २०१६- १७ मध्ये बसविलेल्या शेतकऱ्यांचे १८ कोटी ३१ लाख रुपये 
अनुदान कृषी विभागाकडे जमा झाले आहे. हे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ‘आरटीजीएस’द्वारा जमा करण्याचे काम सुरू आहे. 

शेतकऱ्यांच्या खात्यावर ठिबक सिंचनाचे अनुदान जमा व्हावे, यासाठी २०१२-१३ मध्ये ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती. या वेळी जिल्ह्यातील १३०० च्यावर शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता न आल्यामुळे ते अनुदानास पात्र झाले नव्हते. दैनिक ॲग्रोवन व सकाळमध्ये या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यावर हे अनुदान जमा करण्यात आले होते. २०१३- १४ मध्येही निधी उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील २८०० च्यावर शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करूनही दोन वर्षे उलटून गेले तरी अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थी शेतकऱ्यांच्यात अनुदानाबाबत संभ्रावस्था निर्माण झाली होती. या पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, यासाठी कृषी विभागाकडून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या पाठपुराव्यास यश आले असून, २०१३-१४ मधील २८०० शेतकऱ्यांचे सात कोटी ९३ लाख रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. हे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे, तसेच २०१६-१७ मध्ये चार हजार ५०० शेतकऱ्यांनी बसविलेल्या ठिबक संचाचे दहा कोटी ३८ लाख रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. जमा झालेल्या अनुदानापैकी ४० टक्केवर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून, उर्वरित अनुदानही जमा करण्याचे काम सुरू आहे. 
 

सन २०१३-१४ मधील अनुदानास विलंब झाला. एकूण अनुदानापैकी जिल्हा नियोजन समितीकडून दिला जाणारा २० टक्के निधीही राज्य शासनाने दिला आहे. उपलब्ध झालेले अनुदान संबधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे.
- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, सातारा.

Web Title: irrigation subsidy deposit