
आयर्विन पुलास उभारण्यात येणारा पर्यायी पूल रद्द करण्याबाबत शासनाकडून कोणतीही सूचना नाही.
सांगली : आयर्विन पुलास उभारण्यात येणारा पर्यायी पूल रद्द करण्याबाबत शासनाकडून कोणतीही सूचना नाही. हरिपूर रस्त्यावरील लिंगायत स्मशानभूमीजवळून करण्यात येणारा पूल हा मूळ विकास आराखड्यातीलच आहे. तर आयर्विन पुलाशेजारी होणारा पूल हा कापड पेठेतून जाणार नाही; तसेच सांगलीवाडीकडील मैदानालाही धक्का लागणार नाही. दोन्ही पूल शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजेचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांनी दिली.
श्री. रोकडे म्हणाले, ""सावित्री नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांना पर्यायी पूल उभारण्याचे धोरण होते. त्यानुसार आयर्विन पुलाशेजारी पर्यायी पूल उभारण्यास मंजुरी मिळाली. या पुलास सन 2017 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2019 मध्ये त्याला तांत्रिक मान्यता दिली. हा पूल दोन वर्षात पूर्ण होऊ शकतो. सध्या तरी हा पूल रद्द केल्याबाबत काही माहिती नाही. किंवा तसे आदेशही नाहीत.''
दरम्यान, हा पूल शहरातून कापडपेठेतून जाणार असल्याने त्याला विरोध करण्यात आला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आराखड्यानुसार हा पूल नदीवरुन पुन्हा टिळक चौकाकडे वळवण्यात येणार आहे. कापडपेठेतून जाणार नाही. तरीही या पुलास सांगलीवाडीच्या नागरिकांनी तसेच व्यापारी संघटनांनी विरोध केल्याने या पुलाचे काम रखडले आहे. या पुलाबरोबरच मंजूर झालेल्या हरिपूर कोथळी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
आता महापालिकेच्या मूळ विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या लिंगायत स्मशानभूमीजवळच्या रस्त्यावर कृष्णा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी सर्व्हे करण्याचे तसेच भूसंपादनाचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार आयुक्त नितीन कापडणीस यांनी या पुलासाठी सांगली टोलनाका ते सांगली-कोल्हापूर रस्त्याला मिळणारा डी. पी. रस्ता संपादित करण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे. त्याचे काम सुरू झाले आहे.
आयुक्त कापडणीस म्हणाले, ""आयर्विन पुलाचा पर्यायी पूल रद्द झाल्याबाबत शासनाकडून काही माहिती आलेली नाही. फक्त मूळ विकास आराखड्यात असलेल्या लिंगायत स्मशानभूमीजवळच्या डी. पी. रस्त्यावर कृष्णा नदीवर पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाचे काम करण्यात येणार आहे. हा रस्ता पुढे कोल्हापूर रोडवरील शंभर फुटी रस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे शहरावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.''
टीडीआर देण्याचा प्रयत्न
आयुक्त कापडणीस म्हणाले, ""नवीन पुलासाठी जमीन संपादन करण्यासाठी महापालिकेला नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. पण, महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता जमीन मालकांना त्या बदल्यात टीडीआर देण्यावर भर दिला जाईल. सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. यातील बराचसा भाग हा पूररेषेत येत असल्याने भूसंपादनात अडचणी येणार नाहीत. शिवाय दोन महापुरांचा इतिहास लक्षात घेता या पुलाची उंची वाढवून महापूर काळातही त्याचा उपयोग करता येऊ शकेल का याचाही प्रयत्न करता येईल, असे ते म्हणाले.
दोन्ही पूल महत्त्वाचे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मिरजेचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे म्हणाले, ""शहराबाहेरुन जाणारा रिंग रोड आणि आयर्विन पुलाजवळचा पर्यायी पूल हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. यामुळे शहरावरील वाहतुकीचा ताण चांगलाच कमी होऊ शकतो.''
संपादन : युवराज यादव