जयंतरावांना दुसरा धक्‍का, शिवसेनेच्या पवार बिनविरोध 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

इस्लामपूर - नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुशीला आप्पासाहेब पवार यांनी आज उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शिवसेनेच्या सीमा राजू पवार या बिनविरोध विजयी झाल्या. विरोधी विकास आघाडीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार निशिकांत पाटील यांचे नाव जाहीर करून राष्ट्रवादीला पहिला धक्का दिला. सीमा पवार यांच्या आजच्या विजयाने आघाडीत उत्साह संचारला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुशीला या दिवंगत नगराध्यक्ष एम. डी. पवार यांच्या स्नुषा आहेत. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिवाजी पवार यांच्या त्या आई आहेत. 

खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ नेते नानासाहेब महाडिक यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय विरोधकांची विकास आघाडी उभी केली. त्या आघाडीचे हे पहिले उत्साहवर्धक यश आहे. विजयी झालेल्या सीमा पवार या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांच्या काकू आहेत. विकास आघाडीचे नेते नानासाहेब महाडिक, विक्रम पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, बाबासाहेब सूर्यवंशी, वैभव पवार, अरुण कांबळे यांनी सीमा पवार यांचे अभिनंदन केले. कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. 

इस्लामपुरात दहशतवाद - जयंत पाटील 
बिनविरोध विजयाबाबत आमदार जयंत पाटील म्हणाले, ""आमच्या उमेदवार सुशीला पवार यांचा मुलगा शिवाजी यांना अज्ञातांने धमकावले. गेले सहा दिवस त्यांच्या मागे गुंड लावले आहेत. पवार यांच्यावर पाळत ठेवली जात होती. त्यातूनच ते आजारी पडले. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक, निरीक्षकांकडे तक्रार केली, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी तक्रार द्यायचा सल्ला दिला. मात्र अज्ञातांविरोधात कसली तक्रार देणार? राज्यात आणि आता इस्लामपुरातही कायदा सुव्यवस्था फार वाईट झाली आहे. इथे फेर निवडणुकीची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत.'' 

""आघाडीने विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. आता परिवर्तन अटळ आहे.'' 
खासदार राजू शेट्टी 

""इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत आम्ही शिवसेनेची एक जागा बिनविरोध करून ताकद दाखवून दिली आहे. राष्ट्रवादीची सत्ता उलथवून आम्ही त्यांना आता हद्दपार करू.'' 
आनंदराव पवार, जिल्हाध्यक्ष, शिवसेना 

""शहरातील जनता सुज्ञ आहे. विकास आघाडीची जागा बिनविरोध झाल्याने राष्ट्रवादीला काहीही फरक पडत नाही. बिनविरोध निवडीला शून्य किंमत आहे.'' 
विजय पाटील, पक्षप्रतोद, राष्ट्रवादी. 

""कौटुंबिक अडचणीमुळे आम्ही अर्ज मागे घेतला आहे. यात कोणतेही राजकारण नाही. या घटनेचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये.'' 
सुशीला पवार, माघार घेतलेल्या उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Web Title: islamapura municipality