Vidhansabha2019 : जयंत पाटील यांना रोखण्यासाठी भाजपचा चक्रव्यूह

शांताराम पाटील
गुरुवार, 25 जुलै 2019

जयंत पाटील यांच्या पारंपरिक विरोधकांच्यात निशिकांत पाटील व विलासराव शिंदे यांचे सुपुत्र वैभव शिंदे यांची भर पडल्याने ही निवडणूक चुरशीची होईल यात शंका नाही. मात्र निवडणुकीआधी जयंत विरोधकांच्यात झालेली मी ची बाधा दिसत असून त्यांच्या विरोधात सदाभाऊ  खोत किंवा निशिकांत पाटील हे दोघेही लढत देण्यास इच्छुक आहेत.   

इस्लामपूर -  गेल्या पाच वर्षांत  राज्यभरात भाजप सरकारची सभागृह व सभागृहाबाहेर दमछाक करणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रोखण्यासाठी भाजपने मोठी फिल्डिंग लावली आहे. तर मुरब्बी जयंत पाटील यांनी विरोधकांनी रचलेले चक्रव्यूह मोडून काढत सप्तपदी आमदार म्हणून विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

जयंत पाटील यांच्या पारंपरिक विरोधकांच्यात निशिकांत पाटील व विलासराव शिंदे यांचे सुपुत्र वैभव शिंदे यांची भर पडल्याने ही निवडणूक चुरशीची होईल यात शंका नाही. मात्र निवडणुकीआधी जयंत विरोधकांच्यात झालेली मी ची बाधा दिसत असून त्यांच्या विरोधात सदाभाऊ  खोत किंवा निशिकांत पाटील हे दोघेही लढत देण्यास इच्छुक आहेत.   

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा वाळवा तालुक्‍यासह व मिरज तालुक्‍यातील ८ गावांनी बनला आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांची घट्ट पकड आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी झाल्या आहेत. त्यातील प्रमुख घडामोड म्हणून इस्लामपूर नगरपालिका निवडणूक, सदाभाऊ खोत यांना मिळालेले मंत्रिपद व जयंत पाटील यांचे शिलेदार निशिकांत पाटील व आष्ट्याचे वैभव शिंदे यांचा भाजप प्रवेश या घटनांचा उल्लेख करावा लागेल. त्यातच केंद्रात व राज्यात आलेली भाजपची सत्ता ही सुद्धा या मतदारसंघातील काही बदलांना कारणीभूत आहे.

जयंत पाटील हे राज्यात मुरब्बी व धुरंधर नेते म्हणून ओळखले जातात. वाळवा तालुक्‍यात सहकार चळवळीतील मजबूत संस्था हे त्यांचे बलस्थान आहे. या बलस्थानाच्या जीवावरच त्यांनी तालुक्‍यात व मतदारसंघात  कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केली आहे. अनेकांना या संस्थांच्या पदावर संधी देत त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे या मतदारसंघात नेहमीच चांगल्या मताधिक्‍याने विरोधकांच्यावर आजपर्यंत मात करीत आले आहेत.

गेल्या ३० वर्षांच्या काळात जयंत पाटील यांनी राजकारणातील अनेक चढउतार पाहिले व पचवले आहेत. त्यामुळे त्यांना वाळवा तालुक्‍यातील आजची स्थिती कशापद्धतीने हाताळायची याचे त्यांच्याकडे चांगले कसब आहे. ते ही विधानसभा निवडणूक देखील लिलया जिंकतील असा दावा त्यांच्या समर्थकांच्याकडून छातीठोकपणे केला जात आहे. दुसरीकडे मंत्री सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, निशिकांत पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार, विक्रम पाटील, हुतात्मा उद्योग समूहाचे गौरव नायकवडी, माजी आमदार विलासराव शिंदे यांचे सुपुत्र वैभव शिंदे यांनी एकत्रित येत गेल्या वर्षभरात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चांगली मशागत सुरू केली आहे.

या मशागतीदरम्यान गेल्या ३० वर्षांच्या सत्ताकाळात जयंत पाटील यांच्याकडून दुखावलेले व दुरावलेले गावोगावोचे मोहरे एकत्रित करत त्यांनी  संघटना बांधण्यास सुरवात केली आहे. यातच गेल्या काही महिन्यांपासून सदाभाऊ खोत व निशिकांत पाटील यांच्यात अबोला निर्माण झाला आहे. त्यामुळे विरोधकांच्या एकीच्या पहिल्या घासालाच खडा लागला.  निशिकांत पाटील यांनी आपण भाजपकडून  जयंत पाटलांच्या विरोधात या मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे घोषित करून गावोगाव  कार्यकर्त्यांचे संघटन सुरू केले आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमीत्त इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात ‘अब की बार निशिकांतदादा आमदार’ या आशयाचे झळकणारे फलक निशिकांत पाटील लढणार हे सांगून जातात. या दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्‍यातील पारंपरिक जयंत  पाटील विरोधकांनी समन्वय समिती स्थापन करून त्या समितीचे अध्यक्षपद भीमराव माने यांच्या गळ्यात घातले आहे. भीमराव माने यांनी सदाभाऊ खोत हे जयंत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढतील असा समन्वय समितीने या बाबत निर्णय घेतला आहे असे घोषित केले. त्यामुळे जयंत विरोधकांच्यातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली.

हा मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीत युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला होता. तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे होता. त्यामुळे या दोन्ही  पक्षांनी या मतदारसंघात आपला दावा सांगितला आहे. तर २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात जयंत पाटील यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसचे जितेंद्र पाटील व विरोधी विकास आघाडीचे अभिजित पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी जयंत पाटील यांच्या विरोधात होते. आता राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांच्याशी घरोबा केल्याने त्यांचा कितपत प्रभाव मतदानावर पडतोय हे पहावे लागेल. 

भाजप प्रदेशाध्यक्षांचे विशेष लक्ष्य 
२०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला; मात्र इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टींना १६ हजारांचे मताधिक्‍य  मिळाले आहे. वंचित आघाडीचा या मतदारसंघात फारसा प्रभाव जाणवणार नाही. या मतदारसंघाचे नागनाथअण्णा नायकवडी, राजारामबापू पाटील, विलासराव शिंदे व जयंत पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. यात सर्वाधिक काळ म्हणजे सलग ३० वर्षे जयंत पाटील यांची नोंद आहे. राज्यभर फोडाफोडीत माहीर असलेल्या महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Islampur Assembly Constituency special report