अबब! एका सभेच्या प्रक्षेपणाचा खर्च ४६ हजार

अबब! एका सभेच्या प्रक्षेपणाचा खर्च ४६ हजार

इस्लामपूर - येथील पालिकेच्या प्रत्येक सभेच्या शूटिंग आणि थेट प्रक्षेपणसाठी सुमारे ४६ हजार रुपये खर्च येतो. हा खर्च अतिरिक्त असून हे प्रक्षेपण बंद करण्याची मागणी सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोत विक्रम पाटील यांनी आज सभागृहात केली. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत आज सभा झाली. या विक्रम पाटील यांनी हा प्रश्न मांडला. विक्रम पाटील म्हणाले, या सभेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी नाट्यगृहात येणाऱ्या नागरिकांची संख्या खूपच कमी आहे. यासाठी या नागरिकांना सभागृह खुले करावे, यामुळे हा होणारा अतिरिक्त खर्च वाचेल. यावर नगराध्यक्ष पाटील यांनी पुढील सभेत यावर विचार करून निर्णय घेऊ असे सांगितले.

नगरसेवकांना किंमत नाही, त्यांची पत्रे केराच्या टोपलीत जातात, वर्षभर मागे लागूनही कामे होत नाहीत, ठेकेदार ऐकत नाहीत, असा संताप राष्ट्रवादीने आज सभेत व्यक्त केला. प्रशासनाने संबंधित विभागाला खडे बोल सुनावले.

 नगरसेवकांचे पत्र आल्यास त्याला विभागप्रमुखांनी तातडीने उत्तर देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले. आनंदराव पवार यांनी स्वच्छता ठेक्याच्या तक्रारी मांडल्या.

ठेकेदारावर का दंड केला? कारण काय होते? कर्मचारी किती असतात? असे प्रश्न उपस्थित केले. पुरेसे कर्मचारी आणि स्वच्छता नियोजनावरून मुख्याधिकारी आरोग्य विभागावर भडकले. जे असेल ते स्पष्टपणे बोलत जा, असे सांगत खडे बोल सुनावले. उपनगरातील बगीच्या देखभालीचा ठेका देण्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षात जोरदार खडाजंगी झाली.

विशालनगर परिसरातील बगीचा ठेक्याने ठेकेदारी पद्धतीने देण्यास संजय कोरेनी आक्षेप घेतला. परिसरातील नागरिकांच्या जागेचे हस्तांतर झाले तरी कायदेशीर बाबींचा अभ्यास करून चालवण्यास देण्याची सूचना केली. येथे तिकीट न आकारण्याचे ठरले; सभागृहाला नाममात्र अडीच हजार रुपये भाडे घेण्याचा निर्णय झाला.

डांगे चौकातील जुन्या भाजी मंडईला प्रशासनाने उरूण इस्लामपूर, जुनी भाजी मंडई अण्णासाहेब डांगे चौक हे नामकरण करण्यास आक्षेप घेत शकील सय्यद यांनी तो बोर्ड आधी उतरावा मगच सभेला सुरवात करा, अशी मागणी केली. प्रशासन चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. नगरसेवकाला न विचारता प्रशासनाने जुनी भाजी मंडई अण्णासाहेब डांगे चौक हे नामकरण केल्याने लोकांच्या भावनेचा अवमान होत असल्याचे ते म्हणाले.

शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या जागांना संरक्षक भिंत घालण्याचा निर्णय झाला. फिरते शौचालय खरेदी करताना येणाऱ्या बजेटमध्ये तरतुदींच्या अधीन राहून निर्णय घेण्याची मागणी संजय कोरेनी केली. कर्मचाऱ्यांची जिथे ऑर्डर आहे, तिथेच त्यांनी काम करण्याचा आग्रह विक्रम पाटीलनी धरला. 'साहेबगिरी' करणाऱ्यांना पदानुसार ठेवण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.

रेकॉर्ड रूममध्ये सीसीटीव्ही बसवणे, वार्षिक टेंडर यावर चर्चा झाली. ठेकेदारांना काम देताना कामगारांचे पगार त्यांनी वेळेत करावेत अशी अट घालण्याची मागणी करत आनंदराव पवार यांनी सफाई कामगार प्रशासन परस्पर वापरत असल्याचा आरोप केला.

अंगणवाड्या दुरुस्ती, पालिका मालकीच्या रिकाम्या जागांना संरक्षक कुंपण घालणे, फिरती शौचालय खरेदी, आस्थापनेवरील परिविक्षाधीन कालावधी संपलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे निर्णय झाले. कररूपात येणाऱ्या रक्कमेपेक्षा खर्च जास्त असलेचे प्रशासनाने सभागृहाच्या लक्षात आणून दिले. नगरसेवक खंडेराव जाधव, आनंदराव मलगुंडे, विश्वास डांगे, वैभव पवार, प्रदीप लोहार, अमित ओसवाल यांनी चर्चेत भाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com