esakal | इस्लामपूर पालिका वार्तापत्र : "राष्ट्रवादी'ला विस्कटून टाकण्याचा मनसुबा! 

बोलून बातमी शोधा

Islampur Municipal Corporation Newsletter: Intention to dismantle "NCP"!}

इस्लामपूर नगरपालिकेच्या राजकारणात या पाच वर्षांच्या अंतिम पर्वाकडे जाताना विकास आघाडीने राष्ट्रवादीला विस्कटून टाकण्याचा मनसुबा रचला असून एकावर एक खेळ्या सुरू आहेत.

paschim-maharashtra
इस्लामपूर पालिका वार्तापत्र : "राष्ट्रवादी'ला विस्कटून टाकण्याचा मनसुबा! 
sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर (जि. सांगली) : नगरपालिकेच्या राजकारणात या पाच वर्षांच्या अंतिम पर्वाकडे जाताना विकास आघाडीने राष्ट्रवादीला विस्कटून टाकण्याचा मनसुबा रचला असून एकावर एक खेळ्या सुरू आहेत. "सुडाचे राजकारण' असे जरी आरोप-प्रत्यारोप होत असले तरी राजकारणात "कुणी कुणाचे नसते' हा प्रत्यय याठिकाणी येताना दिसत आहे. "कायद्यावर बोट' ठेवून "जागेवर पलटी'च्या हालचाली नागरिकांमध्ये चर्चेच्या बनल्या आहेत. 

चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादी त्याआधीपासून तीस वर्षे सत्तेत होती. त्यावेळी राष्ट्रवादीतच असलेल्या निशिकांत पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मंत्री जयंत पाटील यांनी देऊ केली असती तर चित्र वेगळे असते, आजही सलग सत्ता त्यांच्याकडेच राहण्याची शक्‍यता होती, पण निर्णय चुकला. आणि सत्तेचे समीकरण विस्कटले. तेव्हापासून पालिकेच्या राजकारणात बहुमत असूनही राष्ट्रवादीला चार वर्षे खाचखळग्यातून जावे लागत आहे.

"कायद्यावर बोट ठेवून' राजकारण करण्याचा धडा नगराध्यक्षांनी शिकवला. त्यासमोर बहुतांशवेळा शांत बसावे लागले; किंबहुना पर्यायच नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीला आता येऊ घातलेल्या निवडणुकांकडून आशा वाढीस लागल्या आहेत. परंतु या अंतिम टप्प्यात सत्ताधारी गटाकडून राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न ताकदीने सुरू आहेत. 

नगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीत भाजपचे पक्षकार्यालय सुरू झाले म्हणून राष्ट्रवादीने आगपाखड केली. तक्रारी केल्या. दुसऱ्याच्या नावाने गाळ्यांचे करार करून हे कार्यालय थाटले गेले, पण कायदेशीर मार्गाने हे कार्यालय टिकवता आले नाही. इथे वर्मावर घाव घातला गेला. सत्ताधारी विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांच्या तक्रारीच्या आधारे माजी नगराध्यक्ष (स्व.) विजयभाऊ पाटील यांच्या काळातील निर्णयांना आव्हान देण्यात आले आहे. त्यांच्या संस्थेने नाममात्र शंभर रुपये भाड्यात चालवण्यास घेतलेली व्यायामशाळा, त्यांच्या पतसंस्थेचा भाडेकरार तसेच निनाईनगर येथील व्यायामशाळा यांना "लक्ष्य' बनवण्यात आले आहे.

प्रसंगी कारवाई करून त्या ताब्यात घेण्याची टोकाची भूमिका घेतली आहे. वर्षानुवर्षे पालिकेच्या गाळ्यांवर कब्जा करून बसलेल्या आणि पोटभाडेकरू ठेऊन त्यांच्याकडून मोठे भाडे लुटणाऱ्यांनाही त्यांनी लक्ष्य बनवले आहे, अर्थात हेही राष्ट्रवादीच्या काळातीलच निर्णय आहेत. या सर्वांना सामोरे जाताना राष्ट्रवादीची दमछाक करून अडचणीत आणण्यात किती यश येईल, हे येणारा काळच ठरवेल! 

पक्षप्रतोदांनी जुळवून घेतले! 
नगराध्यक्ष पाटील यांचे बंधू आणि पक्षप्रतोद विक्रम पाटील हे सत्तेत असूनही विरोधात असल्यासारखे वागत होते. एकमेकांच्यात किती "सख्य' होते याचा प्रत्यय प्रत्येक सभेत आणि बाहेरही यायचा. पण आता "वातावरण' बदलले आहे. पक्षप्रतोदांनी नगराध्यक्षांशी जुळवून घेतले आहे. "बजेट'च्या सभेला इतिहासात कधी नव्हे ते त्यांनी पूर्ण समर्थन दिले. आगामी निवडणुका हेच त्याचे कारण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही! 

संपादन : युवराज यादव