esakal | इस्लामपूर नगरपालिका वार्तापत्र : निवडणुकीला चौरंगी रंग येणार
sakal

बोलून बातमी शोधा

Islampur Municipal Newsletter: Elections will be four-colored

इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. गेल्या वेळच्या विकास आघाडीत फूट पडून राष्ट्रवादीसह चार पॅनेल होण्याची व निवडणूक चौरंगी होण्याची चिन्हे आहेत.

इस्लामपूर नगरपालिका वार्तापत्र : निवडणुकीला चौरंगी रंग येणार

sakal_logo
By
शांताराम पाटील

इस्लामपूर (जि. सांगली) : इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. गेल्या वेळच्या विकास आघाडीत फूट पडून राष्ट्रवादीसह चार पॅनेल होण्याची व निवडणूक चौरंगी होण्याची चिन्हे आहेत. आमदार सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या पॅनेलच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

पालिकेवरील मंत्री जयंत पाटील यांच्या 30 वर्षाच्या वर्चस्वाला हादरा देऊन विरोधकांनी विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. महाडिक, भाजपा, सदाभाऊ खोत, कॉंग्रेस, शिवसेना यांनी एकत्र येत ताकद पणाला लावली. निशिकांत भोसले-पाटील यांनी विकास आघाडीने मोट बांधली. सदाभाऊ मंत्री होते. तर नानासाहेब महाडिक व शेट्टींची त्यांना साथ होती. नानासाहेबांनी ताकद पणाला लावून आघाडीतील अंतर्गत मतभेद मिटवून जयंत पाटील विरोधकांना आघाडीच्या मांडवाखाली आणले होते. सर्वांच्या प्रयत्नाने निशिकांत पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले. 

नेहमी विरोधी बाकावर बसणारे विरोधक सत्तेत आले. भाजपचे खंदे समर्थक विक्रम पाटील, बाबा सूर्यवंशी यांचाही पहिल्यापासून त्यात वाटा होता. विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर काही दिवसांत निशिकांत पाटील व विकास आघाडीच्या काही नगरसेवकांत धुसफूस सुरू झाली. सदाभाऊ आणि निशिकांत यांच्यात मतभेद झाले. एकमेकांची सावलीसारखे असणारे सदाभाऊ व निशिकांत पाटील यांच्यात अबोला झाला. तेथूनच मतभेद चव्हाट्यावर येऊन लागले. शह कटशहाचे राजकारण सुरू झाले. मतभेद टोकाला गेले. नंतर सदाभाऊंनी पालिकेच्या कार्यक्रमांला उपस्थिती लावली नाही. त्यांना निमंत्रणही मिळाले नाही. सदाभाऊंनी "रयत क्रांती' ची स्वतंत्र मोट बांधायला सुरवात केली. येत्या निवडणुकीत ते रयत क्रांतीचे स्वतंत्र पॅनेल करण्याची तयारी करीत आहेत. 

महाडिक गट सुद्धा स्वतंत्र पॅनेल टाकण्याचा तयारीत आहे. शिवसेनाही स्वतंत्र अजेंडा राबवत आहे. शिवसेनेचे अनेक नगरसेवक पालिकेविरोधात आंदोलन करीत आहेत. विकास आघाडीत पुन्हा मनोमिलन होईल, की नाही याबाबत शंकाच आहे. 

राष्ट्रवादीकडून मंत्री जयंत पाटील यांनी आत्तापासूनच प्रभाग निहाय कार्यक्रम घेत झालेल्या चुका टाळण्यासाठी हाताळणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीला विजयभाऊ पाटील यांच्या निधनानंतर सर्व पार्टीवर एकमुखी वर्चस्व असणाऱ्या नेत्याचा अभाव आहे. मात्र यावेळी काही झाले तरी "विकास आघाडीचा कार्यक्रम करायचा' असा मंत्री पाटील यांचा त्यांच्या हालचालीवरून निर्धार दिसत आहे. 

विकास आघाडीत "मीच नेता' या कॅन्सरची लागण झाल्याने वेळीच ऑपरेशन केले नाही, तर नेतेगिरीची हाव आघाडीच्या मुळावर येणार असल्याचे चित्र आहे. 

मोट कोण बांधणार 

गेल्यावेळी दिवगत नानासाहेब महाडिक, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत व राजू शेट्टींमुळे विकास आघाडी शेवटच्या क्षणी एक झाली व एकदिलाने लढली. यावेळी नानासाहेब नाहीत. मोट कोण बांधणार ? हा प्रश्न आहे. सदाभाऊ व शेट्टी यांच्यामधून विस्तव जात नाही. विकास आघाडीतच निशिकांत पाटील, विक्रम पाटील, सदाभाऊ खोत व महाडिक गट व शिवसेना असे चार उभे गट पडलेत. हे सर्वजण आपले जनमत स्वतंत्र आजमावण्याच्या तयारीत आहेत. 

संपादन :  युवराज यादव