राबणाऱ्या हातांनी दिल्या 11 हजार भाकरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

'स्वाभिमानी'च्या आत्मक्‍लेश यात्रेला शिदोरी; "खर्डा, पिठलंही मिरज, वाळव्यातून रवाना

'स्वाभिमानी'च्या आत्मक्‍लेश यात्रेला शिदोरी; "खर्डा, पिठलंही मिरज, वाळव्यातून रवाना
इस्लामपूर - पहाटे घराघरांतील माउली जागी झाली होती, पीठ चाळलं, मळलं अन्‌ पटापट भाकरी थापायला घेतल्या. कुणी चुली पेटवल्या, तर कुणी गॅस शेगड्या. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांची शिदोरी आपल्या घरातून जाणार याचा दांगडा उत्साह इथे संचारला होता. बघता बघता राबणाऱ्या हातांच्या माउलींनी शिदोरी तयार केली...

तब्बल 11 हजार भाकरी अन्‌ खर्डा, पिठलं पुणे-मुंबईच्या दिशेने रवाना झाले. चालून दमलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर यामुळे चैतन्य आलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्‍लेश पदयात्रेसाठी शिदोरी पाठवण्याची जबाबदारी वाळवा आणि मिरज तालुक्‍याची होती.

दोन्ही तालुक्‍यांतील कार्यकर्ते सकाळी लवकर दारात हजर... भाकरी द्या..ऽऽ अशी हाक देत... शेकडो कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन शिदोरी ताब्यात घेतली. एवढ्या लवकर ही पोरं उठली, पायाला भिंकरी बांधली हे पाहून माउलींनी तव्यावरची गरम भाकरी त्यांच्या ताटात वाढली. सोबत काल रात्रीच बनवून ठेवलेला खर्डा, घट्ट दही अन्‌ पिठलं वाढलं. पुढचे तास-दोन तास भाकरी जमवून पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची ऊर्जा मिळाली.

वाळवा तालुक्‍यातील मसूचीवाडी, नवेखेड, कारंदवाडी, शिरटे, लवणमाची, बिचूद तर मिरज तालुक्‍यांतील समडोळी, माळवाडी, सावळवाडी गावांतून 11 हजार भाकरी जमा केल्या. भाकरीने भरलेली वाहने सकाळी आत्मक्‍लेश यात्रेकडे रवानगी झाली. दुपारचा मुक्काम पडण्याआधी या भाकरी त्या ठिकाणी पोच झाल्या.

'शेतकऱ्यांसाठी असलेल्या आत्मक्‍लेश यात्रेसाठी शेतकऱ्यांच्या माउलींनी पाठविलेल्या भाकरी, खर्ड्यामुळे चालून थकला असलो, तरी पुढच्या प्रवासाला ऊर्जा मिळाली.''
- भागवत जाधव, कार्यकर्ता स्वाभिमानी संघटना

उष्णतेने खराब न होणारे अन्न
आत्मक्‍लेश यात्रेतील कार्यकर्त्यांना शिदोरी देण्याचे ठरल्यानंतर सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णतेने शक्‍यतो खराब न होणारे अन्न पाठवण्याचे ठरले होते. त्यामुळे पिठलं आणि खर्डा तयार करण्याचा मेनू ठरला. हे पदार्थ तयार करताना तशी काळजी घेतली होती.

Web Title: islampur news bhakari for swabhimani aatmaclesh yatra