सक्तमजुरीची शिक्षा होताच आरोपीने ठोकली धूम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

इस्लामपूर - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेऊन बलात्कार केल्याच्या आरोपावरून ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील सागर ऊर्फ बंडा नथुराम वाघमोडे (वय 20) याला दहा वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंडाची शिक्षा येथील न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयातून बाहेर आल्यावर वाघमोडे याने पोलिसांना हिसका देत पलायन केले. काही वेळाने न्यायालयाच्या परिसरातील एका गल्लीत तो सापडल्याने पळून-पळून दमछाक झालेल्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

लाडेगाव येथून 9 मार्च 2016 रोजी संबंधित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत सागर वाघमोडे याने पळवून नेले. त्याने तिच्याशी वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. याबाबतची फिर्याद मुलीच्या नातेवाइकांनी कुरळप पोलिस ठाण्यात दिली होती. शिक्षा सुनावल्यानंतर वाघमोडेला न्यायालयाबाहेर आणले. या वेळी पोलिसांना हिसका देऊन त्याने धूम ठोकली. न्यायालयापासून जवळच असलेल्या वडर गल्लीत एका इमारतीजवळ अंगावर बारदान घेऊन तो लपला होता. त्याच्या मागे धावत असलेल्या पोलिसांना तो सापडला. या प्रकारात न्यायालयात आरोपीला हजर करण्यासाठी आलेल्या पोलिसांची मात्र दमछाक झाली.

Web Title: islampur news crime