फडणवीसांच्या जीवावर गोतावळ्याला लाभ - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

इस्लामपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर बोलणाऱ्या सदाभाऊ खोतांना आयुष्यात एक संस्था उभारता आली नाही. त्याची अक्कलही नाही. राज्यमंत्री झाल्यावर त्यांनी कृषी अवजारांचा घोटाळा केला. गोतावळ्याला लाभ मिळवून दिला. ते घोटाळेबाज सदाभाऊ जयंत पाटलांशी काय बरोबरी करणार, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली. 

इस्लामपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर बोलणाऱ्या सदाभाऊ खोतांना आयुष्यात एक संस्था उभारता आली नाही. त्याची अक्कलही नाही. राज्यमंत्री झाल्यावर त्यांनी कृषी अवजारांचा घोटाळा केला. गोतावळ्याला लाभ मिळवून दिला. ते घोटाळेबाज सदाभाऊ जयंत पाटलांशी काय बरोबरी करणार, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली. 

जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात हल्लाबोल सभेत ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, सुमनताई पाटील, चित्रा वाघ, विलासराव शिंदे, प्रकाश शेंडगे, दिलीप पाटील, मानसिंगराव नाईक, अण्णासाहेब डांगे यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

श्री. मुंडे म्हणाले, ‘‘चार वर्षांत राज्य व देशातील लोक भाजपच्या फसव्या कारभाराला वैतागलेत. प्रत्येक जातीला फसवण्याचे काम चालले आहे. धनगर समाजाला फसवले. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले ते सुद्धा सरकारने कायद्यात अडकवून मिळू दिले नाही. गरिबाला खायला अन्न नाही आणि पंतप्रधान शौचालयाची भाषा बोलतात.’’ 

श्री. पवार म्हणाले, ‘‘ओहोटी, भरती येते. कार्यकर्त्यांनी न डगमगता नेत्यामागे ठाम उभे राहणे आवश्‍यक आहे. इस्लामपुरात असलेले बगिचे, स्टेडियम व इथला विकास पाहिला असता हे कोणामुळे झाले, याचा विचार करणे गरजेचे आहे. नगरपालिकेच्या निकालाने नेत्याला खिजवले जाते.

जयंत पाटलांच्या वेदनांचा विचार करून यापुढे जीवाभावाची साथ द्यावी. बारामतीचा की इस्लामपूरचा उमेदवार जास्त मतांनी येतो अशी स्पर्धा घेऊ. जयंतराव राज्यभर व विधिमंडळात ज्या तडफेने काम करतात ते पाहून घरात थांबवण्यासाठी काहींचा खटाटोप सुरू आहे.’’ 

श्री. तटकरे म्हणाले, ‘‘खोतांना वाटतंय माझा सातबारा कायम आहे. त्यांनी लक्षात ठेवावे आमचा सातबारा पेन्सिलने नाही पेनने लिहिलाय. इस्लामपुरात जयंत पाटील यांचा सातबारा जनतेच्या हृदयात कायम आहे.’’

जयंत पाटील म्हणाले, ‘‘राज्य सरकारने उंदीर मारतानासुद्धा पैसे खाता येतात, हे दाखवून दिले. भाजप व शिवसेनेने आमचे सरकार भ्रष्ट असल्याचा आरोप अनेक वेळा केला. त्याचा एकही पुरावा ते देऊ शकले नाहीत. आरोप सिद्ध करू शकले नाहीत. काहींना आमदार नाही, मंत्री झाल्याची स्वप्ने पडू लागलीत. माझ्या मतदारांना माहीत आहे, कुणाला कधी आणि कसे मतदान करायचे. ते सजग आहेत. जनतेला खाली बघायला लागेल असे माझ्याकडून कधीच काम झाले नाही. काही माझ्यावर चुकीचा व टोकाचा आरोप करतात, मी बोलत नाही. बोलायचं नसतंच. लोकांना अनुभवाने कळते.’’ 

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी स्वागत केले. संजय पाटील यांनी आभार मानले.

फुटाणा मंत्री...!
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका करीत सदाभाऊ फुटाणा मंत्री आहे. त्यांच्या सांगण्यावरून फडणवीस महिन्यात तीन वेळा आले. हा मंत्री मला चांगलाच भितो. त्याला माहीत आहे, माझ्या नादाला लागल्यावर काय खरं नाही.

जयंत पाटलांवर अडचणीची वेळ येईल त्या वेळी मी शेलारमामा होईन. जयंत पाटील यांनी सदाभाऊंचे नाव न घेता काहींची किंमत एक-दीड आणा आहे. त्यांच्यावर बोलायला इतक्‍या खाली जाणार नाही.

Web Title: islampur news dhananjay munde hallabol rally speech politics