द्विधा सदाभाऊंचा निर्णय 21 जुलैला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

इस्लामपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना चौकशी समितीपुढे हजर होण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतर त्यांनी समितीसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र त्याचवेळी संघटनेची स्वतंत्र नोंदणी करण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच भाजपमध्ये प्रवेश करण्याचाही पर्याय असल्यामुळे सध्या खोत द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत.

संघटनेने खोत यांना चौकशी समितीसमोर 21 जुलैपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. संघटनेने 24 प्रश्‍नांची यादी सदाभाऊंना दिली असून, त्यांनी समितीपुढे जायचा निर्णयही घेतला आहे. तथापि, संघटना आणि सदाभाऊंमधील दरी पाहता आता त्यांचे परतीचे दोर कापले असून, पुढचा त्यांचा पवित्रा काय याबाबत तालुक्‍यातील त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

सदाभाऊंनी राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी व नेत्यांशी संपर्क साधत नव्या जुळणीला सुरवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांना हाताला धरत शेतकऱ्यांची नवीन संघटना स्थापन करता येईल का? याची ते चाचपणी करत आहेत. शेतकरी संघटनेचे नेते म्हणून आपली उपयुक्तता भाजपला अधिक असेल, असा त्यांचा होरा आहे. पाशा पटेल यांच्याप्रमाणे ते भाजपवासी झाले तर त्यांना भाजपमध्ये नव्याने श्रीगणेशा करावा लागेल. या दोन्ही पर्यायांबाबत सदाभाऊंकडून चाचपणी सुरू असून, त्याला मूर्त स्वरूप 21 जुलैनंतरच येईल.

Web Title: islampur news sadabhau khot decission 21st july