‘भाजप’मय सदाभाऊ अन्‌ ‘स्वाभिमानी’ची फाळणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

इस्लामपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक झेंडा आज मुंबईत भाजप सरकारवर आसूड उगारायला सरसावला असताना दुसरा झेंडा सदाभाऊ खोत यांच्या रूपाने इस्लामपुरात भाजपच्या झेंड्याला खेटून उभा होता.

सदाभाऊंनी छातीवर बिल्लाही लावला होता; पण लोकांच्या डोक्‍यावरील टोपीवरची ‘सदाभाऊ समर्थक’ ही मोहोर संघटनेची शकले झाल्याची साक्ष देत होती. ‘नायकाची प्रतिमा मोठी करण्यासाठी मला खलनायक ठरवलं जातंय’ असा खासदार राजू शेट्टींवर आरोप करणाऱ्या सदाभाऊंनी मोठी गर्दी करून ‘खलनायक नहीं, नायक हूँ मैं!’ अशी जणू आज गर्जनाच  केली. 

इस्लामपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक झेंडा आज मुंबईत भाजप सरकारवर आसूड उगारायला सरसावला असताना दुसरा झेंडा सदाभाऊ खोत यांच्या रूपाने इस्लामपुरात भाजपच्या झेंड्याला खेटून उभा होता.

सदाभाऊंनी छातीवर बिल्लाही लावला होता; पण लोकांच्या डोक्‍यावरील टोपीवरची ‘सदाभाऊ समर्थक’ ही मोहोर संघटनेची शकले झाल्याची साक्ष देत होती. ‘नायकाची प्रतिमा मोठी करण्यासाठी मला खलनायक ठरवलं जातंय’ असा खासदार राजू शेट्टींवर आरोप करणाऱ्या सदाभाऊंनी मोठी गर्दी करून ‘खलनायक नहीं, नायक हूँ मैं!’ अशी जणू आज गर्जनाच  केली. 

शेतकरी संघटनेतील राम-लक्ष्मणाची जोडी फुटली आहे. पोपट मेला आहे, हे पहिल्यांदा कुणी सांगायचे हे अकबर-बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे झाले आहे. 
सदाभाऊंना संघटनेत स्थान काय उरलेय, असं म्हणणाऱ्यांना मोठी गर्दी करून उत्तर द्यायचाही खोतांचा हा प्रयत्न होता. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव यांचा भाजप प्रवेश त्यांनीच घडवून आणला. ‘स्वाभिमानी’चा बिल्ला लावून भाजप प्रवेशाचा मेळावा थाटात पार पाडला. स्वतः भाजपचे माप ओलांडण्याविषयी मात्र ‘घात आल्यावर निर्णय घेतो’, असे सांगून तूर्त बोलणे टाळले.

खासदार शेट्टींची आत्मक्‍लेश पदयात्रा मुंबईच्या मायानगरीत पोचत असताना त्याच मुहूर्तावर इस्लामपुरात भाजप मेळावा व्हावा आणि तोही सदाभाऊंनी भरवावा, हा केवळ योगायोग नव्हता. यल्लम्मा चौकाच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या वाळवा, मिरजसह शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी या शेट्टींच्या हक्काच्या टापूतून आल्या होत्या. त्यावर ‘स्वाभिमानी’चे झेंडे फडकत होते; पण भव्य शामियान्यातील शानदार व्यासपीठावर संघटनेचे ना नाव होते, ना निशाण! फक्त भाजपचे चिन्ह आणि पक्षातील बड्या प्रतिमा. शेतकऱ्यांनीच गाडीवरचे झेंडे आणून मंडपात भाजपच्या झेंड्याजवळ खोचले. शत्‌प्रतिशत भाजपच्या मेळाव्यात या झेंड्याची तेवढी हजेरी होती, बाकी सदाभाऊंसह सारेच भाजपमय झाले होते. 

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या गडात मेळावा होत असल्याने मुख्य टार्गेट तेच राहिले. मुख्यमंत्र्यांपासून ते सागर खोतांपर्यंत साऱ्यांनी जयंतरावांवर सडकून टीका केली. बाहुबली अन्‌ कटाप्पाचे किस्सेही रंगले; पण हा खेळ इस्लामपुरात नवा नाही. शेट्टींना हाणलेल्या कोपरखळ्या हाच नवा गडी, नवा डाव सांगणाऱ्या होत्या. सदाभाऊंसमोर शेतकरी आंदोलनाला टोला हाणताना मुख्यमंत्र्यांनी मागे पाहिले नाही. ऊठसूट आंदोलने करण्यापेक्षा २०-२५ गावांत जलयुक्त शिवारची कामे करा, हा टोला तसा सभ्य होता. परंतु, आंदोलकांना बोचणारा होता. त्यापुढे जाऊन फडणवीस यांनी ‘‘सरकारच्या कामामुळे आंदोलन करणाऱ्यांना आपली दुकानदारी बंद पडेल, त्याला टाळे लागेल, अशी भीती वाटते’’, असा ‘स्वाभिमान’ दुखावणारा आघातही केला. सारी हयात आंदोलनात घालवलेल्या सदाभाऊंसमोर हे झाले. 

सरकारची बाजू मांडताना थोडं सावरून बोलणाऱ्या सदाभाऊंनीही आवाज मोकळा सोडून ऊस दरापासून ते शेतकरी हिताच्या धोरणांपर्यंत सरकारवर स्तुतिसुमने उधळली. सोबत शेट्टींचे नाव न घेताना ‘खबरदार’चा इशारा दिला. 

सदाभाऊ मनाने भाजपचे झालेतच; पण भाजप प्रवेशाच्या परिणामांचा विचार करून त्यांची पावले खोळंबली आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी ‘वाट ठरलीय’, हे ठासून सांगितले. घात कधी येते, हे लवकरच कळेल.

Web Title: islampur news swabhimani shetkari sanghatana distribution