शेरेबाजी आणि तक्रारींनी सभा गाजली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

इस्लामपूर - पाच वर्षांतील विविध विभागांच्या कामाचा आढावा, शेरेबाजी आणि तक्रारी, अशा संमिश्र विषयांनी वाळवा पंचायत समितीची नव्या सदस्यांची पहिली सभा गाजली. सभापतींनी समजूतदारपणाची, तर उपसभापतींनी सामंजस्याची भूमिका निभावली. विकास आघाडीचे गटनेते राहुल महाडिक यांनी आज सभागृहात घेतलेला पवित्रा आगामी संघर्षाची चुणूक दाखविणारा होता. सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, श्री. खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिलीच सभा झाली.

हातपंप दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याचा ठराव प्रशासनाने मांडला. मूल्यांकनाची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची सूचना देवराज पाटील यांनी केली. आशिष काळे यांनी बावची पेयजल योजनेचे काम ६ वर्षे रखडल्याचा विषय मांडला. महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मर्दवाडी भारत निर्माण योजनेचे अद्याप हस्तांतर नाही, त्यामुळे करवसुलीत अडथळे येत असल्याचा मुद्दा जनार्दन पाटील यांनी उपस्थित केला. गटनेते राहुल महाडिक यांनी शालेय पोषण आहार दर्जाचा आणि सहा महिने बिले मिळत नसल्याचा मुद्दा मांडला. त्यावर अनुदानाची अडचण सांगण्यात आली. 

बागणी, वाळवा, नेर्ले, पेठ आणि बोरगाव या आरोग्य केंद्र भागात मुलींचा जन्मदर कमी आहे. केंद्रात डॉक्‍टर राहत नसल्याचा मुद्दा काळे यांनी मांडला. रुग्ण कल्याण समित्या स्थापण्याचे ठरले. ॲड. विजय खरात यांनी बोगस वैद्यकीय उपचारांचा मुद्दा मांडला. तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली. 

बहादूरवाडी आणि तांदूळवाडी येथील करवसुलीची चौकशीची मागणी महाडिक यांनी केली. तालुका कृषी अधिकारी रजेवर होते. त्यावर महाडिक यांनी मिटिंगच्या दिवशी अधिकाऱ्यांनी रजा घेऊ नयेत, यापुढे सर्व अधिकारी हजर हवेत, अशी सूचना केली. 

पी. टी. पाटील यांनी डिजिटल फलक लावण्यावर कर आकारणीचा, तर आनंदराव पाटील यांनी एस. टी. फेऱ्या वाढविण्याचा मुद्दा मांडला. उन्हाळा व तीव्र उकाडा असल्याने या दोन महिन्यात विजेच्या तक्रारी येऊ नयेत, अशी सूचना महाडिक यांनी केली.

‘शासन तुमचे, आम्हाला साथ द्या’
शालेय पोषण आहार अनुदान मुद्यावर उपसभापती नेताजी पाटील यांनी ‘अनुदानासाठी आम्ही प्रयत्न करू पण राज्यात शासन तुमचे आहे, पाठपुरावा करा’ असा टोमणा मारला. त्यावर ‘सरकार तुमचे नेते चालवत असल्याची चर्चा होते, मग अनुदान मिळवायला काय अडचण आहे?’ असा सवाल महाडिक यांनी उपस्थित केला.

माईक बंदमुळे संताप
राहुल महाडिक यांनी सभागृहातील टेबलवरील माईक बंद असल्याची नाराजी मांडत ‘ठेकेदार कोण आहे? बोलवा त्याला आणि दुरुस्त करा, मला हे चालणार नाही!’ या भाषेत दम दिला. संबंधित अधिकारी आठ दिवसांत दुरुस्त करतो म्हणाले.

Web Title: islampur panchayat