सांगलीच्या भावे नाट्यमंदिरातील असुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

सांगलीच्या भावे नाट्यमंदिरातील असुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

सांगली - येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी उष्मा असह्य झाल्याने अभिनेते वैभव मांगले रंगमंचावरच कोसळले. यानिमित्ताने या नाट्यगृहातील असुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कलाकार आणि रसिकांची सुविधांबाबत नेहमीच ओरड सुरू असते, त्याचवेळी व्यवस्थापनाकडून मात्र निधीच्या टंचाईचा मुद्दा पुढे येत असतो. यात सांगलीबद्दल, इथल्या नाट्यगृहांबद्दल बाहेर होणारी प्रतिमा मात्र नाट्यपंढरी बिरुद लावणाऱ्या सांगलीकरांवरील नामुष्कीच आहे.

सांगलीत महापालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहाचा उपयोग सभा-कार्यक्रमांपुरताच उरला आहे. लावणीचे काही कार्यक्रम इथे होतात त्यामुळे त्याची थिएटर एवढी ओळख. आहे ते नाट्यगृह किमान सुविधा देऊन वापरात ठेवण्याइतपत महापालिकेच्या कारभाऱ्यांकडे-प्रशासनाकडे इच्छाशक्ती नाही. दुसरीकडे भावे नाट्यगृह एकमेव असे ठिकाण आहे की जिथे नाटक होऊ शकते. मात्र तिथल्या समस्यांचा पाढा न संपणारा आहे.

या नाट्यगृहातील ध्वनिव्यवस्थेबद्दल सर्वच ज्येष्ठ कलावंत कौतुक करीत असतात; मात्र त्याचवेळी जवळपास ७५ वर्षांची वाटचाल पूर्ण करणाऱ्या या नाट्यगृहात काळानुरूप सुविधा मात्र झालेल्या नाहीत. कलाकारांसाठी विश्रांती कक्ष नाही. मेकअप कक्षाची अवस्था दयनीय आहे. नाट्यगृहात वातानुकूलित व्यवस्था आता चैन राहिलेली नसून ती गरज बनली आहे.

पार्किंग परिसराचे पावसाळ्यात तळे होत असते. या समस्यांकडे वर्षानुवर्षे व्यवस्थापनाचे पूर्णतः दुर्लक्षच झाले आहे. सांगलीच्या नाट्यक्षेत्राची मातृसंस्था असलेल्या या संस्थेच्या व्यवस्थापनाने आता कात टाकून वर्तमानाच्या गरजा ओळखून कामकाजात सुधारणा केल्या पाहिजेत. प्रतिवर्षी रंगभूमी दिनाचा सोपस्कारापलीकडे जाऊन कलाकार-रसिकांच्या अपेक्षा व्यवस्थापनाने समजून घेतल्या पाहिजेत.

राज्यात नावलौिकक असलेल्या बहुतेक नाट्यगृहांमध्ये एसी सुविधा आहे. शेजारच्या इचलकरंजी नगरपालिकेच्या नाट्यगृहातही ही सुविधा आहे. दिलीप प्रभावळकरांसारखे कलाकार तर सुरवातीपासून उन्हाळ्यात सांगलीत प्रयोगाला नकार देतात. वैभव मांगले यांच्यावर ओढवलेली वेळ सांगलीला नामुष्की आणणारी आहे. इथले लोकप्रतिनिधी आणि ‘भावे’ व्यवस्थापनाने त्यापासून धडा घ्यावा.
- धनंजय गाडगीळ,
नाट्य वितरक 

‘‘अभिनेते वैभव मांगले यांच्यावर ओढवलेली वेळ कुणावरही येऊ शकते. नाट्यगृहात किमान सुविधा दिल्या जाव्यात. नाट्यगृहाचा देखभाल खर्च आणि उत्पन्न यातून नुतनीकरणासाठी निधी उपलब्ध होणे अवघड आहे हे मान्य मात्र शासनाकडून निधी मिळवण्यासाठी व्यवस्थापनाने प्रयत्न करावेत. आम्ही त्यांना सर्वोतपरी मदत करु.’’
- श्रीनिवास जरंडीकर,
अध्यक्ष, नाट्य परिषद शाखा सांगली

‘‘ रंगमंचापुरती तरी एसीची सुविधा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. शासनाकडे आम्ही मदतीसाठी प्रस्ताव पाठवले होते मात्र त्याची दखल घेतली जात नाही. संपुर्ण नाट्यगृहच वातानुकूलीत करण्यासाठी शासनाने मदत द्यावी. आमदार सुधीर गाडगीळ यांनी त्यात लक्ष घालावे.’’
- विनायक केळकर,

उपाध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य विद्या मंदिर समिती 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com