नगररचना विभागातील फायलींना पाय फुटलेच नाहीत

नगररचना विभागातील फायलींना पाय फुटलेच नाहीत

कोल्हापूर - नगररचना विभागातील (एडीटीपी) फायलींना खरेच पाय फुटले काय? याची चौकशी करण्यासाठी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी तातडीने दोघा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. रात्री या फायलींनी पाय फुटले नसून सर्व ४९७ फायली जाग्यावर असल्याचा निष्कर्ष चौकशी अधिकाऱ्यांनी काढला. तशी माहिती आयुक्तांनी रात्री उशिरा दिली.

नगरचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांची बदली होऊनही त्यांच्या ताब्यात फायली असल्याची तक्रार नगरसेवक भूपाल शेटे यांनी आयुक्तांकडे सकाळी केली. त्यानुसार कामगार अधिकारी सुधाकर चेल्लावाड व आयुक्त कार्यालयातील लिपिक विष्णू कारड यांना तक्रारीची खातरजमा करण्याचे आदेश दिले. दरम्यान, अडीचशे फायली खोतांच्या घरातून आणल्याचा आरोपही नगरसेवक शेटे यांनी केला. 

राजारामपुरी जनता बझार येथील तिसऱ्या मजल्यावरील नगररचना विभागात दुपारी बारापासून रात्री आठपर्यंत फायलींची तपासणी सुरू होती. बांधकाम परवान्यापासून कब्जेपट्टीसह अन्य कामांच्या अनेक फायली होत्या. १५ ऑगस्टनंतर नेमक्‍या किती फायली इनवर्ड झाल्या, याची माहिती घेतली गेली. एडीटीपींकडून अन्य अधिकाऱ्यांकडे फायली कधी गेल्या? याचीही तपासणी झाली.

तपासणीच्या तारखेपासून ते आजअखेर ४९७ फायली नगररचना विभागातच असल्याचे चेल्लावाड यांनी सांगितले. आयुक्तांनी थेट चौकशीचे आदेश दिल्याने नगररचना विभागात दिवसभर खळबळ उडाली, प्रत्येक फाईल दाखल केव्हा झाली, ती पुढे केव्हा सरकली याची माहिती घेण्यात आली. अचानक झालेल्या चौकशीमुळे नगरचना विभागातील अन्य अधिकारी भांबावून गेले. फाईल जाग्यावर आहे की नाही, याची तपासणी करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले होते. 

नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत (एडीटीपी) यांची नुकतीच प्रतिनियुक्तीवर बदली झाली आहे. त्यांच्या ठिकाणी एस. बी. महाजन नव्याने रुजू झाले आहेत. बदली होऊनही खोत यांनी फायलीसोबत ठेवल्याचा आरोप शेटे यांनी केला होता. शेटे रात्री नगररचना विभागात दाखल झाले. त्यांनी तपासणीची माहिती घेतली. संबंधित फायली संबंधित अधिकाऱ्याच्या घरीच होत्या. माहिती लागल्यानंतर महेश सरनाईक या कर्मचाऱ्याने फायली आणल्याचा आरोप केला. सरनाईक यांनी मात्र या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले.

महत्त्वाचे विषय अखत्यारीत
बांधकाम परवाना, भोगवटा प्रमाणपत्र, भूसंपादन, तात्पुरते लेआऊट, फायनल लेआऊटला मंजुरी, स्मशानभूमी, आरक्षण टाकणे टीडीआर असे विषय नगररचना विभागाच्या अखत्यारीत येतात. शहराचा चेहरामोहरा या विभागावर अवलंबून आहे. महापालिकेत ताणतणावाचे काम म्हणून ज्या विभागांची ओळख आहे. त्यात नगररचनेचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com