गोकुळ मल्टिस्टेटबाबत आम्ही नेत्यांसोबत; संचालकांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या विषयावर नेते जो निर्णय घेतील, त्याबरोबर आम्ही राहू, अशी ग्वाही संचालकांनी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली.

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या विषयावर नेते जो निर्णय घेतील, त्याबरोबर आम्ही राहू, अशी ग्वाही संचालकांनी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली. संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात झालेल्या बैठकीला संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील उपस्थित होते. बैठकीला माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील, रणजितसिंह पाटील व अनिल यादव यांनी दांडी मारली.

संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी अलीकडेच संघ मल्टिस्टेट करण्यावरून बंडाचे निशाण उगारले आहे. हे करत असताना त्यांनी नेत्यांवरच अविश्‍वास दाखवत आनंदराव पाटील-चुयेकर यांच्यासारखा विश्‍वासू नेता राहिला नसल्याचा टोला लगावला होता. त्यानंतर लगेच आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन संघ मल्टिस्टेटला पुन्हा विरोध दर्शवत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर संचालकांची मते जाणून घेण्यासाठी नेत्यांनी बैठक घेतली.

बैठकीच्या सुरुवातीलाच संघ मल्टिस्टेटबाबत कोणाचे काय मत आहे का ? अशी विचारणा नेत्यांनी केल्यानंतर याबाबत नेते जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहू, असे संचालकांनी सांगितले. बैठकीतून बाहेर पडलेल्या श्री. महाडिक यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘संघाचा जो काही निर्णय असेल तो मी एकटा घेऊ शकत नाही, संचालकांनीच ते ठरवावे लागते. नेते म्हणून आम्ही फक्त मार्गदर्शन करतो. जो काय निर्णय होईल तो संचालक घेतील.’’ अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन याबाबत संचालकांची भूमिका स्पष्ट करू, असे जाता जाता सांगितले.

तीन संचालक गैरहजर
बैठकीला श्री. डोंगळे यांना निमंत्रणच नव्हते, त्यामुळे ते आले नाहीत. उर्वरित संचालकांपैकी माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील, रणजितसिंह पाटील व स्वीकृत संचालक अनिल यादव गैरहजर राहिले. यापैकी रणजितसिंह व यादव हे पंढरपूरला आषाढी वारीला गेल्याचे सांगण्यात आले.

आबाजींची दांडी चर्चेची
संघाचे अध्यक्ष असताना रोज सकाळ-संध्याकाळ श्री. महाडिक यांच्यासोबत सावलीसारखे असणारे विश्‍वास पाटील अध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यापासून एकदाही श्री. महाडिक यांना भेटलेले नाहीत. आजच्या बैठकीला श्री. महाडिक आहेत म्हणूनच त्यांनी बैठकीला पाठ फिरवल्याची चर्चा संचालकांत होती. श्री. पाटील माजी आमदार पी. एन. पाटील यांचे नेतृत्व मानतात, त्यामुळे पी. एन. यांची उपस्थिती म्हणजे आबाजी आलेच, अशी प्रतिक्रियाही काहींनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Gokul Multistate