#RiverPollution कृष्णा नदीत विष सोडलंय कुणी?

#RiverPollution  कृष्णा नदीत विष सोडलंय कुणी?

सांगली - कृष्णा नदीत गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले असून, आता एका अजस्त्र मगरीने मिरज कृष्णाघाट परिसरात जीव सोडला. कृष्णा नदीत असे कोणते विष मिसळले आहे, जे मासे आणि मगरींच्याच जीवावर उठलेय. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अद्याप त्याच्या शोध घेतलेला नसला तरी ॲनिमल राहत संस्थेने आता मृत मासे तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णा नदीशी सुरू असलेला हा खेळ साऱ्यांच्याच मुळावर उठतोय आणि त्याचे कुठल्याच यंत्रणेला गांभीर्य नाही, हे दुर्दैवी आहे.

कृष्णेत गेल्या आठ दिवसांपासून मृत माशांचे खच तरंगू लागले आहेत. केवळ सांगलीत नव्हे, तर पलूस तालुक्‍यात तीच स्थिती आहे. नदी वाहती आहे. त्यामुळे कुठेतरी एकाच ठिकाणी विष पेरलेय, असे नाही. पण, ते कुठे, याचा मात्र पत्ता लागलेला नाही. पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाल्यावर मासे तडफडून मृत्यू पावतात, असे साधारण सांगितले जाते.

ऑक्‍सिजन कमी होण्याच्या कारणांत  थेट नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात मिसळणे, साखर कारखान्यांची मळी मिसळणे या गोष्टी नेहमीच घडत आल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यात साऱ्याची व्यवस्था अपयशी ठरल्या आहेत. 

गूढ वाढलेय

ॲनिमल राहत संस्थेने मद्रास क्रोकोडाईल बॅंक ट्रस्टचे संचालक निखिल विटेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी साडेतीन हजार मगरी सांभाळल्या आहेत.  त्यांनी सांगितले, की मृत मासे खावून मगर मरेल, अशी स्थिती नाही. ते पचवण्याची तिची क्षमता असते. त्यामुळे काहीतरी वेगळे घडले असावे, अशी भिती आहे. दरम्यान, मृत मयरीचे कृष्णाकाठी दहन करण्यात आले. 

२९ गावांचे पाणी
कृष्णा नदीत आजही जिल्ह्यातील तब्बल २९ गावांचे सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळते. गेली कित्येक वर्षे या गावांना सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत नोटिसांवर नोटिसा काढल्या गेल्या आहेत. त्यानंतरही योजना काहीच नाही. 

कृष्णा नदीत नेमके काय घडतेय, याचा शोध आधी घ्यावा लागेल. त्यासाठी आम्ही नुकतेच मेलेले मासे जमा करतोय. ते आम्ही तपासणीसाठी पुढे वन विभाग, प्रदूषण नियंत्रणा विभागाकडे पाठवत आहोत. त्यातूनच कळेल की घडलेय काय? मासेच आधी तपासणे गरजेचे आहे.
-किरण नाईक
, सदस्य, ॲनिमल राहत

साऱ्यांची बदली; काम कोण पाहणार
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एल. एस. भड यांची सातारा येथे  बदली झाली आहे. त्यांचा पदभार श्री. माने यांच्याकडे सोपवला. आता माने यांची रायगड येथे बदली झाले आहे. येथे सोलापूरचे अधिकारी श्री. औताडे हजर होणार आहेत. तोवर जबाबदारी कुणाची? 

मनपाला दंड तरीही...
प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला नाल्याचे पाणी थेट नदीत मिसळत असल्या प्रकरणी दररोज साडेतीन लाख रुपयांचा दंड केला आहे. धुळगाव योजना सुरू आहे, मात्र ती पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने बरेचसे पाणी कृष्णेत मिसळते आहे. 

कारखान्यांकडे कानाडोळा
कृष्णा नदीकाठच्या औद्योगिक कारखान्यांतून सोडले जाणारे केमिकलयुक्त पाणी थेट कृष्णा नदीत मिसळल्याची अनेक प्रकरणे आधी घडलेली आहे. यावेळीही असाच प्रकार घडल्याची कृष्णाकाठी चर्चा आहे, मात्र हे पाणी कुणाचे? कुणी विष सोडले, याची कसून चौकशी होण्याची गरज आहे.  माशांची प्रचंड प्रमाणात मरतूक झाली आहे. कारखान्यांकडे कानाडोळा केला, तर उद्या सांगलीकरांवर विष पिण्याचे संकट येऊ शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com