पंतप्रधान आले, गेले.. तपोवनचा चरखाश्रम भग्नावस्थेतच

सुधाकर काशीद
शुक्रवार, 22 मार्च 2019

- ‘‘इस मैदान पर १९२५ साल में खुद महात्मा गांधी आये थें. उन्होंने यहाँ चरखाश्रम बनाया, देखो इस आश्रम की आज क्‍या हालत है? क्‍या किया राज्य शासन ने इतने साल,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्‍टोबर २०१४ रोजी कोल्हापुरात तपोवन मैदानावर झालेल्या सभेत म्हणाले होते.

कोल्हापूर - ‘‘इस मैदान पर १९२५ साल में खुद महात्मा गांधी आये थें. उन्होंने यहाँ चरखाश्रम बनाया, देखो इस आश्रम की आज क्‍या हालत है? क्‍या किया राज्य शासन ने इतने साल,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्‍टोबर २०१४ रोजी कोल्हापुरात तपोवन मैदानावर झालेल्या सभेत म्हणाले होते. या वाक्‍याला टाळ्याही पडल्या होत्या. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ते आले होते. निवडणुकीचा निकाल लागला. भाजप युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. आज त्याला साडेचार वर्षे झाली. आता दोन दिवसांनी याच तपोवन मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठीच येणार आहेत. आजही चरखाश्रम चार वर्षांपूर्वीसारखाच भग्नावस्थेत आहे. त्यामुळे आता कोणी कोणाला दोष द्यायचा, हा प्रश्‍न आहे. ज्या मैदानावर रविवारी फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रचाराचा प्रारंभ होणार आहे, ते तपोवन मैदान भक्ती सेवा विद्यापीठ संस्थेचे.

१९१७ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ४६ एकर जागा दिली व तेथे तपोवन आश्रम निवासी शाळा सुरू झाली. २५ मार्च १९२५ रोजी महात्मा गांधी यांनी तपोवनला भेट दिली. त्यांच्या हस्ते तेथे चरखाश्रम या वास्तूची पायाभरणी झाली. या चरखाश्रमात विद्यार्थ्यांकडून सूतकताई करून घेतली जात होती. ते सूत विकून त्यातून मिळणारा पैसा स्वातंत्र्यचळवळीसाठी दिला जात होता. स्वातंत्र्यानंतरही येथे सूतकताई सुरू होती. काळाच्या ओघात सूतकताई कमी झाली व ही वास्तू उपेक्षेच्या गर्तेत आली. हळूहळू ही वास्तू भग्न पावत गेली.

२०१४ मध्ये पंतप्रधान मोदी या मैदानावर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले आणि त्यांनी भाषणात या मैदानाचा इतिहासच सांगितला. त्यांनी या मैदानावर १९२५ मध्ये महात्मा गांधी आल्याचे सांगितले आणि चरखाश्रमाच्या सद्यःस्थितीबद्दल खंत व्यक्त केली. आजवर काँग्रेस सरकारने चरखाश्रमासाठी काय केले? अशी जाहीर टीका मोदींनी केली. 

पुढे त्यांच्या पक्षाचे सरकार सत्तेवर आले; पण तपोवन आहे तेथेच राहिले. भग्नावस्थेतला चरखाश्रम आहे तसाच राहिला. त्याची दुरुस्ती कधी, कोणी केली आहे? उलट चार वर्षांत चरखाश्रमावरची होती ती कौलेही जमीनदोस्त झाली. आता तर येथे महात्मा गांधींचा चरखाश्रम होता असे सांगायची वेळ आली. 

आता योगायोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच मैदानावर याच चरखाश्रमासमोर सभेला येणार आहेत. व्यासपीठावरून त्यांच्या नजरेच्या टप्प्यातच चरखाश्रमाचे भग्नावशेष असणार आहेत. खुद्द मोदींनी उल्लेख केलेल्या या चरखाश्रमाबाबत आता मुख्यमंत्री काय करणार? हा तर प्रश्‍न आहेच; पण राजकारणाच्या फडात महात्मा गांधींचा चरखाश्रमही कसा भांडवल होऊ शकतो, याचे हे ढळढळीत उदाहरण ठरले आहे. 

विद्यार्थ्यांना सूतकताईचे धडे
या चरखाश्रमात बाबा पराजंपे, के. आर. कुलकर्णी, बाबा रेडीकर व जयवंतराव सरनाईक सूतकताईचे प्रशिक्षण देत होते. तेथे चरखे होते. टकळ्या होत्या. एवढेच काय, तपोवनमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सूतकताईचा विषय होता. जयवंतराव सरनाईक यांच्या निधनानंतर हा चरखाश्रम दुर्लक्षित होत गेला. ही वास्तू भक्ती सेवा विद्यापीठ संस्थेच्या अखत्यारीतील जागेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Mahatma Gandhi inaugurated Tapovan Charkah Ashram