मिरजेच्या उरुसात पायदळी तुडवले जाताहेत निरागस जीव

शंकर भोसले
सोमवार, 8 एप्रिल 2019

कुठून येतात मुले
सांगली, मिरजेत एसटी स्थानक, रेल्वे स्थानकासह बाजारात भीक मागणाऱ्यांची मोठी साखळी आहे. ती सध्या बाजारातून गायब झाली असून, त्यांनी मिरजेच्या उरुसात तळ ठोकला आहे. एरवी या मुलांना काखेत घेऊन ती उपाशी असल्याचे सांगून पैसे मागितले जात होते. येथे त्या मुलांनाच रस्त्यावर बसवून भीक मागितली जात आहे.

मिरज - इथल्या उरुसात माणसांच्या गर्दीचे लोंढे वाहताहेत. घामाच्या धारा पुसत, वाट काढत पावले उचलली जाताहेत. त्या पायांखाली अचानक निरागस चेहरे तुडवले जाताहेत. त्यांची ठेच लागतेय. केवळ पायाला नाही तर मनालाही वेदना देणारी ठेच. दोन-पाच वर्षे वयाची निरागस मुलं पायाखाली येताहेत.

भीक मागायला त्यांच्या माय-बापानंच त्यांना बसवलंय. आपण काय करतोय, त्यांना माहितीही नाही. ती निमूटपणे रडवलेल्या चेहऱ्याने ‘सुजाण’ माणसांच्या उत्सवात गुदमरताहेत. त्यांच्या जगण्याचा तमाशा मांडलाय, त्यांच्याच जन्मदात्यांनी, त्या जन्मदात्यांची साखळी पोसून त्यावर पैसे कमावणाऱ्या हैवाणांनी. त्यांना रोखले नाही, तर मिरजेच्या उरुसात पायाखाली येऊन काही कोवळे जीव गुदमरतील. 

येथील उरुसात भयावह प्रकार घडतोय. माणुसकी शिल्लक असणाऱ्या माणसांना धक्का देणारा. मिरज शहर पोलिस ठाण्यापासून ते दर्ग्यापर्यंतच्या पाचशे मीटर अंतरावर जवळपास पंचवीस लहान मुले भर रस्त्यात मधोमध बसवली गेली आहेत. भीक मागण्यासाठी. ती अवघी दोन-पाच वर्षांची आहेत. उकाडा प्रचंड आहे, श्‍वास घ्यायला त्रास होतोय, जमीन भाजतेय. त्यात ते केवळ जीव, काहींना झोप येतेय, तेथेच कलंडत आहेत, डोक्‍याला मार लागतोय. रडताहेत, पुन्हा उठू बसताहेत. दूर कुठेतरी बसून एक अदृश्‍य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवतेय, वेळच्या वेळी त्यांच्या वाडग्यातून पैसे घेऊन जातेय.

या गंभीर विषयाकडे कुणाचेच लक्ष नाही. मिरज शहर पोलिसांकडे शनिवारी अज्ञातांनी या प्रकाराची माहिती दिली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी मुलांना हटवले, त्यांच्या पालकांची झाडपट्टी केली. त्यानंतर पुन्हा अर्धा तासाने ती मुले त्याच ठिकाणी बसवली गेली. 

कुठून येतात मुले
सांगली, मिरजेत एसटी स्थानक, रेल्वे स्थानकासह बाजारात भीक मागणाऱ्यांची मोठी साखळी आहे. ती सध्या बाजारातून गायब झाली असून, त्यांनी मिरजेच्या उरुसात तळ ठोकला आहे. एरवी या मुलांना काखेत घेऊन ती उपाशी असल्याचे सांगून पैसे मागितले जात होते. येथे त्या मुलांनाच रस्त्यावर बसवून भीक मागितली जात आहे.

Web Title: issue of miserable, helpless child in Miraj special story