पंचगेगेच्या प्रदुषित पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचे आरोग्य धोक्यात

पंचगेगेच्या प्रदुषित पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचे आरोग्य धोक्यात

जयसिंगपूर - येथे पंचगंगेचे पाणी काळे झाले आहे. नदीकाठच्या गावांना आठ दिवसांपासून नदीपात्रात जनावरेदेखील तोंड लावणार नाहीत, असे काळे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नदीकाठच्या १७४ गावांतील ४१ लाख लोकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

उन्हाळ्यात नदीपात्रात पाण्याचा प्रवाह कमी असल्याने गटारी आणि औद्योगिक वसाहतींचे रसायनयुक्त सांडपाणी महिनाभरापासून नदीपात्रात तुंबून राहिले होते. पात्रात पाणी सोडल्यामुळे हेच पाणी आता पुढे सरकू लागले आहे. आठवड्याभरापासून नदीपात्रात पूर्ण काळे पाणी संथ गतीने वाहू लागले आहे. दूषित पाण्यामुळे सातत्याने नदीपात्रात लाखो मासे मृत होण्याच्या घटना घडत आहेत. 

काही दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांविरोधात कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली खरी पण सध्या कारवाई थांबलेली आहे. प्रयाग चिखलीपर्यंत स्वच्छ असणारी पंचगंगा तेथून पुढे मात्र प्रदूषणामुळे गुदमरत आहे. औद्योगिक वसाहतींच्या रसायनयुक्त पाण्यामुळे सर्वाधिक प्रदूषण होत आहे.

१९९७ पासून पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आंदोलने केली जात आहेत. पंधरा वर्षांपूर्वी प्रोसेसधारकांची बैठक झाली होती. त्यानंतर म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. प्रोसेसमुळेच सर्वाधिक प्रदूषण होते. आंदोलने केल्यानंतर केवळ नोटिसा देण्यापलीकडे कारवाई होत नाही, हे दुर्दैव आहे. 
- विश्‍वास बालिघाटे,
आंदोलक, शिरढोण.    

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सातत्याने आंदोलने केली आहेत. आमदार उल्हास पाटील यांनी संगम ते उगम पदयात्रा काढून तसेच लोकसेभेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनीही विविध प्रकारची आंदोलने करून शासनाला याचे गांभीर्य 
दाखवून दिले. वीस वर्षाहून अधिक काळापासून पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा प्रश्‍न हाती घेतला आहे, मात्र शासनाकडून याला प्रतिसाद मिळाला नाही. सध्या पंचगंगा विषवाहिनी बनली असून, नदीकाठावरील लोकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

पंचगंगा नदी पुन्हा कोरडी

इचलकरंजी - शहरातील नागरिकांना उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण, पंचगंगा नदी पुन्हा कोरडी पडली. त्यामुळे नदीतील पाणी उपसा बंद राहिला असून, आता कृष्णा योजनेवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्यात तीन दिवसांनंतर पाणी मिळेल. कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला गळती लागली होती.

ती काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू करण्यात आला. रोज ३० ते ३२ एमएलडी पाणी उपसा केला जातो. प्रत्यक्षात किमान रोज ५४ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी शहरवासीयांना आता दोनऐवजी तीन दिवसांनंतर पाणी दिले जाईल. 

उन्हाळ्यात पंचगंगा नदीचा मोठा आधार असतो. पण, या उन्हाळ्यात दुसऱ्यांदा पंचगंगा नदी कोरडी पडली आहे. फक्त सखल भागात दूषित पाणी साचून राहिले. पंचगंगा योजनेचे इंटेकवेल प्रथमच उघडे पडले आहे. त्यामुळे पंचगंगा नदीतील पाणी उपसा पूर्णतः बंद पडला. नदीतून रोज नऊ एमएलडी पाणी उपसा केला जात होता. आता या पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. परिणामी, शहरात पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात दाही दिशा करण्याची वेळ आली. उपलब्ध पाणी पुढील आणखी काही दिवस तरी काटकसरीने वापरावे लागणार आहे. 

कूपनलिकांचा आधार 
शहरात मोठ्या प्रमाणात कूपनलिका आहेत. विविध कामांसाठी कूपनलिकांच्या पाण्याचा वापर केला जातो. उन्हाळ्यात कूपनलिकाच मोठा आधार ठरतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com