पंचगंगा प्रदूषणप्रश्नी अतिरिक्त आयुक्त, प्रभारी जलअभियंत्यांना नोटिसा

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी अतिरिक्त आयुक्त, प्रभारी जलअभियंत्यांना नोटिसा

कोल्हापूर - प्रदूषित पाणी पंचगंगेत मिसळण्याच्या प्रकाराची आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गंभीर दखल घेतली. अतिरिक्त आयुक्तांसह प्रभारी जलअभियंत्यांना त्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या.

शहरातील सांडपाणी जयंती नाल्यात येते. तेथून ते कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाते. सहा पंपांद्वारे सांडपाण्याचा उपसा होतो. त्यातील दोन पंपांत बिघाड झाल्याने फेसाळलेले सांडपाणी काल (ता. १५) थेट पंचगंगा नदीत मिसळत होते.

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्‍न शासनस्तरावरून गांभीर्याने घेतला जात असताना काल सांडपाणी नदीत मिसळले. या सांडपाण्याचे परिणाम इचलकरंजी नदीकाठच्या गावांना भोगावे लागतात. नदीच्या स्वच्छ पाण्यात मैलामिश्रीत सांडपाणी मिसळते. अनेक वर्षांपासून प्रदूषित पाणी शहराच्या हद्दीतून नदीत जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला वेळोवेळी सूचना केली आहे; मात्र प्रदूषणामुळे पंचगंगेचे दुखणे काही कमी झालेले नाही.

आयुक्त कलशेट्टी यांनी भेट देऊन पंपिंगची पाहणी केली. सहापैकी दोन पंप बंद असल्याने सांडपाणी मिसळत असल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावर तातडीने उपाय करण्याचे सांगून सांडपाणी पुन्हा नदीच्या दिशेने जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. दुपारी त्यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, प्रभारी जवअभियंता सुरेश कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटिस बजावली. एसटीपीचे ठेकेदार असलेल्या विश्‍वा इन्फ्रास्टक्‍चरला कारणे दाखवा नोटिस बजावण्याची आदेश त्यांनी जलअभियंत्यांना दिले. गाळ काढणे, पाणी साठविण्याची क्षमता वाढविणे, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली.

दुपारी दोनच्या सुमारास जयंती नाला, सुतारमळा, सिध्दार्थनगर येथून सांडपाणी मिसळत असलेल्या ठिकांणांची त्यांनी पाहणी केली. सुतारमळा सिद्धार्थनगर येथे मातीचा बंधारा घालून सांडपाणी अडविण्याची सूचना केली. जुना बुधवार पेठ येथे चेंबरमधून मिसळणारे सांडपाणी अन्यत्र वळवावे, अशीही सूचना केली. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, विश्‍वा इन्फ्रास्ट्रक्‍चरचे पवनकुमार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com