एसएफसी मॉलची होणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

सांगली - सांगली शहरात स्टेशनरोडवरील सतत वादग्रस्त ठरलेल्या एसएफसी मेगा मॉलचे बेकायदेशीर पार्किंग आणि महापालिकेच्या भूखंडाचा बेकायदेशीर वापर यावरून स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली.

सांगली - सांगली शहरात स्टेशनरोडवरील सतत वादग्रस्त ठरलेल्या एसएफसी मेगा मॉलचे बेकायदेशीर पार्किंग आणि महापालिकेच्या भूखंडाचा बेकायदेशीर वापर यावरून स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. या मॉलचे काम संशयास्पद असल्याने संपूर्ण चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश स्थायी समिती सभापती अजिंक्‍य पाटील यांनी आज प्रशासनाला दिले. महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अजिंक्‍य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
एसएफसी मॉल आणि त्याच्या मागे असलेल्या गणेश मार्केट यांच्यामध्ये एक भिंत बांधली आहे. त्यामुळे गणेश मार्केटचे गाळे दिसत नसल्याने ते बंद असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. मॉलची इमारत व्यापारी असल्याने मोफत पार्किंग देण्याची जबाबदारी मॉलची असताना तेथे बेकायदेशीर पे-पार्किंग सुरू असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. शिवाय मॉलशेजारीच असलेल्या महापालिकेच्या खुल्या भूखंडावर सध्या स्पर्धा सुरू आहेत.

त्यासाठीही विनापरवाना जागा वापरली जाते. त्याचा कर महापालिकेला भरला जात नाही. यावरुनही आवाज उठवत मॉलच्या मुळ कागदपत्रांची चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. सभापती अजिंक्‍य पाटील यांनी मॉलच्या कामात संशय असल्याची शंका व्यक्त करत बांधकाम परवान्यासह सर्व कागदपत्रांची माहिती महिनाभरात देण्याचे आदेश दिले. 

खोकी हस्तांतर व वारस हक्क नोंदणीचे सुमारे दोनशे प्रस्ताव प्रलंबित आहेत. हे प्रस्ताव मार्गी लावल्यास महापालिकेच्या उत्पन्नात एक ते दीड कोटींची वाढ होईल, असे मत ॲड. स्वाती शिंदे यांनी व्यक्त केले. सभापतींनी या संदर्भातील सर्व प्रस्ताव एकत्रित करून स्थायीला सादर करावेत, असे आदेश दिले.

मोबाईल कंपन्यांना स्वतंत्र भाडे
महापालिका क्षेत्रातील मोबाईल टॉवरवरून अनेक कंपन्यांनी आपल्या नेटवर्कची फ्रिक्वेन्सी दिली आहे, मात्र एकाच कंपनीकडून कर घेतला जातो. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने उत्पन्नवाढीचे विषय प्रलंबित राहू नयेत. अधिकृत व अनधिकृत मोबाईल टॉवर्सचा कंपनीनिहाय सर्व्हे करून सर्व कंपन्यांना स्वतंत्र भाडे आकारावे, त्यांना कर लागू करावा, असे आदेश सभापती पाटील यांनी दिले. विष्णू माने, संजय मेंढे, ॲड. स्वाती शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

Web Title: issue of SFC moll in Sangli Corporation meeting

टॅग्स