‘दूरशिक्षण’कडील तीन विषयांचे वाजले तीनतेरा

संदीप खांडेकर
सोमवार, 24 डिसेंबर 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागात एम.ए.भाग-१ इंग्रजी, मॅथेमॅटिक्‍स व इकॉनॉमिक्‍स विषयांच्या प्रवेशाचा मुहूर्त अद्याप लागलेला नाही. दोन्ही विषय सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रस्ताव पाठविला असला, तरी त्याचे उत्तर आलेले नाही. पहिले सत्र, परीक्षा संपूनही प्रश्‍न सुटलेला नाही.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागात एम.ए.भाग-१ इंग्रजी, मॅथेमॅटिक्‍स व इकॉनॉमिक्‍स विषयांच्या प्रवेशाचा मुहूर्त अद्याप लागलेला नाही. दोन्ही विषय सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रस्ताव पाठविला असला, तरी त्याचे उत्तर आलेले नाही. पहिले सत्र, परीक्षा संपूनही प्रश्‍न सुटलेला नाही.

दूरशिक्षण विभागाकडे दरवर्षी ३० हजारांवर काम करून शिकणारे, नोकरदार, महिला प्रवेश घेतात. काम करून डिग्री मिळविण्यासाठी हा विभाग त्यांच्यासाठी आधारवड ठरतो. इंग्रजी, मॅथेमॅटिक्‍स व इकॉनॉमिक्‍स विषयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. यंदा मात्र या तिन्ही विषयांचा तिढा सुटलेला नाही. यूजीसीने यंदा नव्या नियमांची भर घातल्याने या विषयांत काही त्रुटी राहिल्या होत्या. त्या दोन टप्प्यांत पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी विद्यापीठाची समिती १२ डिसेंबरला दिल्लीला गेली होती. तेथे संबंधित विषयांचे सादरीकरणही केले. हे विषय लवकरात लवकर सुरू व्हावेत, यासाठी पाठपुरावा केला असला, तरी यूजीसीकडून विषयांना मान्यता मिळणे आवश्‍यक होते. याचे प्रवेश कधी सुरू होणार? याची चौकशी विद्यार्थ्यांकडून होत आहे. विभागाकडून दिल्या जाणाऱ्या उत्तराने त्यांचे समाधान होत नाही.

विद्यापीठ प्रशासनाने आवश्‍यक बाबींची पूर्तता केली आहे. केवळ मान्यतेचा प्रश्‍न बाकी आहे. मान्यता मिळाली, की प्रवेश सुरू केले जातील आणि परीक्षांचा प्रश्‍न मार्गी लावला जाईल. 
- डॉ. डी. टी. शिर्के,
प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ.

वर्ष वाया जाऊ नये, हीच विद्यार्थ्यांची अपेक्षा 
पहिल्या सत्रातील विविध विषयांच्या सेमिस्टर झाल्या आहेत. या तीन विषयांना येत्या आठवड्यात मान्यता मिळाली, तर त्याच्या परीक्षांचा ताळमेळ प्रशासनाला बसवावा लागणार आहे. ही स्थिती राज्यातील अन्य दूरशिक्षण विभागांचीसुद्धा आहे. तेथील विद्यार्थ्यांनाही प्रवेश कधी सुरू होतील, याची प्रतीक्षा आहे. तिन्ही विषय नोकरी मिळविण्यासाठी महत्त्वाचे असल्याने हे वर्ष वाया जाऊ नये, हीच त्यांची अपेक्षा आहे. यूजीसीकडून या विषयांना मान्यता मिळाल्यास विद्यार्थी दूरशिक्षण विभागाकडे चौकशीसाठी नव्हे तर प्रवेशासाठी येतील, असे चित्र दिसेल.

Web Title: issue of three subjects in distance education