वीर शिवा काशिद समाधी परिसराची दुरवस्था

आनंद जगताप
शुक्रवार, 12 जुलै 2019

हाती राजदंड घेतलेल्या, भाला घेतलेल्या मावळ्यांच्या हातात शेजारच्या चिव्याच्या बेटातील काठ्या आल्या. त्यांचे मूळ रंग काळाच्या उदरात गडप झाले. चेहऱ्याचा रंग गेल्याने त्यावरील करारी बाणा, भारदस्तपणा मलूल झाला. सुरक्षा रक्षकाचा पगार तटल्याने तो निघून गेला.

पन्हाळा - स्वराज्यासाठी बलिदान देणारा. मरण समोर दिसत असूनही प्रतिशिवाजी बनून सिद्धी जोहारच्या भेटीस जाणारा स्वामिनिष्ठ मावळा वीर शिवा काशिद. या मावळ्याच्या यशोगाथेतून तरणाईने बोध घ्यावा म्हणून तत्कालीन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारत पाटील यांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूरच्या हद्धीत शिवा काशिद समाधी परिसराचा विकास करण्याचा विडा उचलला आणि तो प्रत्यक्षातही आणला; पण त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे समाधी परिसराची आज दुरवस्था झाली आहे.  शनिवारी वीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी असून, यावेळी अभिवादन करताना समाधी परिसर देखभालीबाबत शिवप्रेमी काय भूमिका घेणार, हा प्रश्‍न आहे.

जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती व लोकसहभागातून समाधीपर्यंत रस्ता, संरक्षक कठडा, समाधीवर मेघडंबरी, वीजपुरवठा, पाण्याची सोय, दगडी शिळात भालदार, चोपदार यांचे पुतळे, युद्ध प्रसंगाच्या, विविध प्राण्यांच्या पक्षांच्या प्रतिकृती उभारून समाधी परिसर लोकांच्या नजरेस आणला. १ फेब्रुवारी २०१४ ला या समाधीस्थळाचा लोकार्पण सोहळाही झाला.

तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी १५ दिवसात या स्मारकाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची, संरक्षक भिंत, प्रवेशद्वारासाठी निधी देण्याची घोषणा केली. त्यापैकी प्रवेशद्वाराची तेवढी पूर्तता झाली. आमदार सतेज पाटील यांनी स्मारकाच्या संरक्षणासाठी नेबापूर, बुधवारपेठ ग्रामपंचायतीना  ग्रामविकास विभागाकडून २० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. त्यापैकी प्रत्यक्षात बुधवारपेठ रस्त्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी दिला. बाकी घोषणा विरून गेल्या. 

भारत पाटील यांचे येथे येणजाणे होते तोपर्यंत इथे सुरक्षारक्षक राहिला, पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू राहिली. रात्रीच्या अंधारात वीजेच्या मंद दिव्याच्या उजेडात स्मारकाचे बारकावे नजरेस भरू लागले. लावलेली झाडे उमेदीने वाढू लागली.

परिसरात विविध कार्यक्रम होऊ लागले. नाभिक समाजाच्या विविध संघटना येऊ लागल्या. अभिमानाने मिरवू लागल्या. पर्यटकांचा ओढा वाढला; पण कालांतराने जसे भारत पाटील यांचे इकडे दुर्लक्ष झाले, तशी स्मारकास मरगळ आली. हाती राजदंड घेतलेल्या, भाला घेतलेल्या मावळ्यांच्या हातात शेजारच्या चिव्याच्या बेटातील काठ्या आल्या. त्यांचे मूळ रंग काळाच्या उदरात गडप झाले. चेहऱ्याचा रंग गेल्याने त्यावरील करारी बाणा, भारदस्तपणा मलूल झाला. सुरक्षा रक्षकाचा पगार तटल्याने तो निघून गेला. बील तटल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. पाण्याच्या पाइप, हौदाच्या चाव्या गायब झाल्या. प्राण्यांच्या प्रतिक्रुती मोडून पडल्या.

जबाबदारी नेमकी कुणाची?
लाखो रुपये खर्च करून, कमानीसाठी एका कामकागाराची आहुती देऊन ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या परिसराच्या रक्षणाची जबाबदारी नेमकी कुणाची? हाच प्रश्‍न पर्यटकांतून विचारला जात आहे. लोकांमधून कायमस्वरूपी निधी गोळा करून भारत पाटील यांनी तयार केलेली शिवसृष्टी कशी चिरंतन राहील याचा विचार करून ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Veer Shiva Kashid Samadhi condition