कर्नाटकातून जत तालुक्याला पाणी मिळावे यासाठी राज्यपालांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

सांगली - जत तालुक्‍याच्या उमदी-जालीहाळ भागासाठी कर्नाटक शासनाच्या सिंचन योजनांमधून पाणी देण्याबाबत महाराष्ट्र व कर्नाटक शासनाच्या सिंचनमंत्र्यांची संयुक्त बैठक बोलवावी, या मागणीसाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना येत्या रविवारी (ता.१३) साकडे घालण्यात येणार आहे.

सांगली - जत तालुक्‍याच्या उमदी-जालीहाळ भागासाठी कर्नाटक शासनाच्या सिंचन योजनांमधून पाणी देण्याबाबत महाराष्ट्र व कर्नाटक शासनाच्या सिंचनमंत्र्यांची संयुक्त बैठक बोलवावी, या मागणीसाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना येत्या रविवारी (ता.१३) साकडे घालण्यात येणार आहे. भाजप नेत्या नीता केळकर यांनी जत तालुक्‍यातील ग्रामस्थ आणि राजकीय कार्यकर्त्यांसह राज्यपालांना भेटणार असल्याचे सांगितले. 

काही वर्षे यासाठी येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीने पाठपुरावा केला. ‘सकाळ’ने या प्रश्‍नी सातत्याने पाठपुरावा केला आहे. 

जत तालुक्‍यातील तुबची बबलेश्‍वर योजना आता पूर्ण झाली आहे. जत तालुक्‍याच्या सीमेपासून कर्नाटकात अवघ्या सहा किलोमीटरपर्यंत कृष्णेचे पाणी आले आहे. सध्याच्या टंचाईच्या काळात योजनेतून महाराष्ट्राने कर्नाटकला कोयना धरणातून पाणी द्यावे. त्याबदल्यात  एक टीएमसी पाणी जत तालुक्‍याच्या अग्नेय भागातील जालीहाळ उमदीसह ४२ गावांना पाणी द्यावे, अशी ही योजना आहे.

याबाबत ‘सकाळ’ने हे शक्‍य आहे अशी भूमिका घेत पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दहा कोटींच्या निधीची घोषणा केली; मात्र प्रत्यक्षात ही योजना येऊ शकली नाही. आता कर्नाटकच्या सिंचन योजनाही पूर्ण झाल्या असून आता हे पाणी जतच्या अगदी डोईशेजारी आले आहे. 

राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांनीही संयुक्त बैठकीचे आश्‍वासन दिले आहे, मात्र आम्ही पुढील आठवड्यात कर्नाटकचे जलसंपदामंत्री शिवकुमार यांच्याशी भेटीची वेळ घेतली आहे.
- विठ्ठल पाटील,
अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद

कर्नाटक शासनासोबतच्या दरवर्षी देत असलेल्या देवघेवीतील सुमारे पावणेसहा टीएमसी पाणी महाराष्ट्राला येणे आहे. त्यामुळे कालच जलसंपदामंत्री गिरीश  महाजन यांनी कर्नाटकच्या जलसंपदा विभागाकडे तत्काळ पत्रव्यवहाराचे आदेश दिले आहेत, तथापि दोन्ही शासनांशी सामंजस्य करार होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत.
- नीता केळकर
, भाजप नेत्या

कर्नाटकला आपल्याकडून पाण्याची अपेक्षा आहे. जत तालुक्‍याच्या अगदी सीमेवर पाणी आले आहे. महाराष्ट्र सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन दोन्ही राज्यांमध्ये सामंजस्य करार करून जत तालुकावासीयांची तहान भागवावी.
- एन. व्ही. देशपांडे
, सचिव, येरळा प्रोजेक्‍ट
सोसायटी

Web Title: issue on water for Jat Taluka from Karnataka

टॅग्स