आश्वी - गारोळेवाडीत पाणी आल्याने, महिलांना आनंदाश्रू अनावर

issue of water solved for ashwi village sangamner
issue of water solved for ashwi village sangamner

आश्वी : पावसाळ्याचे चार महिने वगळता, उर्वरित आठ महिने पिण्याच्या पाण्यासाठी दररोज अडीच किलोमीटर अंतरावरील खोल दरीतल्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीवर जाणे हा नित्यक्रम झालेल्या गारोळे पठार येथील महिलांची पायपीट अखेर आज थांबली. जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या पाठपुराव्यामुळे थेट विहीरीपर्यंत विज पोचल्याने, गारोळे पठारचा पाणीप्रश्न सुटला.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गारोळे पठार या अवघ्या साडेतीनशे लोकसंख्येच्या ठाकर वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी, खोल दरीतल्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीवर अडीच किलोमीटरची डोंगरवाट उतरुन यावे लागत असे. पिण्याच्या पाण्यासाठी एवढा आटापिटा करुन, नंतर पुन्हा पोटासाठी मोलमजुरीला जावे लागत असे. गारोळे पठारची समस्या प्रसार माध्यमातून समजल्याने संगमनेरचे उद्योजक मालपाणी बंधूंनी मागील वर्षींच्या दिवाळीत सुमारे पाच लाख रुपये खर्चातून, पाण्याच्या उद्भवाची विहीर ते पठारावरील गारोळे पठारापर्यंत पाईप लाईन व पाणी उचलण्यासाठी विजपंपाची दिवाळी भेट दिली. ग्रामस्थांनी श्रमदान करुन हे सायफन केले. मात्र या विहीरीवर विजजोड नसल्याने ही यंत्रणा कुचकामी ठरली.

स्थानिक ग्रामपंचायतीने यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवले, निवेदने दिली. शेवटी विशेष घटक योजनेतून सुमारे १३ लाख रुपये, स्वतंत्र रोहित्रही मंजूर झाले. मात्र या निधीतले काम गारोळे पठार पर्यंत नेण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने हाही मार्ग खुंटला. जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे १४ व्या वित्त आयोगातून या वाडीसाठी निधी मिळाला. कुरकुंडी गावापासून विहिरीपर्यंत ९ विजेचे खांब उभारुन, स्वतंत्र थ्रीफेज वाहिनी देण्यात आली. हे काम शनिवार ( ता. १४ ) रोजी पूर्ण झाले. आज सकाळी गारोळे पठारच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पोचलेल्या पाण्याचे जलपूजन थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती अजय फटांगरे, पंचायत समितीच्या सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, सदस्या प्रियांका गडगे, सरपंच संदीप सांगळे, उपसरपंच बशीर चौगुले, संतोष शेळके, पप्पू चौगूले, विकास शेळके, सुहास वाळूंज, संदेश गाडेकर, अरुण कुरकुटे, आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.    

सुमारे दोन वर्षापासून विजजोडा अभावी वस्तीतील पाण्याच्या टाकीत पाणी येऊ न शकल्याने, गारोळे पठारच्या महिलांची पाण्यासाठीची पायपीट आता थांबणार आहे. आज थेट वस्तीवरील पाण्याच्या टाकीत पडणारा पाण्याचा प्रवाह पाहून आदिवासी कष्टकरी महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com