गुरुजींबरोबर आता अधिकाऱ्यांनाही ब्लेझर 

संतोष सिरसट
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या गुरुजींना काळ्या रंगाचा ब्लेझर घालणे बंधनकारक केले आहे. गुरुजींना ब्लेझर बंधनकारक करत असताना शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाही ब्लेझर घालणे बंधनकारक केले आहे. याबाबतचे परिपत्रक आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी काढले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 19 नोव्हेंबरपासून होणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या 18 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी व कधीपासून करायची याबाबत बऱ्याच बैठका घेण्यात आल्या. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला. मात्र, त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांना गणवेशाबरोबरच ब्लेझरही घालायला लावण्यास प्रशासनाने भाग पाडले. त्यामुळे शिक्षक संघटनांनी आरडाओरड करूनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. गुरुजींबरोबरच केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी काळ्या रंगाची पॅंट व पांढऱ्या रंगाचा गणवेश वापरायचा आहे. त्याचबरोबर काळ्या रंगाचा ब्लेझरही वापरायचा आहे. 

ब्लेझरच्या डाव्या बाजूला जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा. त्याचबरोबर त्याच्या खाली जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभाग असाही उल्लेख करण्याच्या सूचना या परिपत्रकामध्ये दिल्या आहेत. केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी या संवर्गातील अधिकारी जर महिला असतील तर त्यांनी आकाशी रंगाची साडी परिधान करायची आहे. अधिकाऱ्यांची जिल्हा स्तरावर असणाऱ्या बैठका व अन्य कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचा लोगो असलेल्या काळ्या ब्लेझरसह गणवेश परिधान करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू या विषयावर आता पडदा पडला आहे.

अन्यथा प्रशासकीय पातळीवर दखल 

19 नोव्हेंबरपासून ड्रेसकोडच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, विभागप्रमुख हे वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन शिक्षकांचा अभिनंदन करणार आहेत. जर शिक्षकांनी या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली जाईल, असेही त्या परिपत्रकात म्हटले आहे. 

Web Title: It is compulsory To wear blazer teacher and government officers