मृत्यूला कवटाळणं इतकं सोपं व्हावं..?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

सातारा - गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात कौटुंबिक वादातून घडणाऱ्या हत्या व आत्महत्यांच्या घटना पाहता मृत्यूला कवटाळणं इतकं सोपं व्हावं..? असा प्रश्‍न साहजिकच निर्माण होतो. कौटुंबिक वाद कोणत्याही प्रकारचा असो, त्यावर तोडगा नाहीच असे होऊ शकत नाही. मात्र, परस्परांतील संवादाचा अभाव, शांतपणे तोडगा काढण्यासाठी अपुरा संयम यामुळे टोकाची भूमिका उचलली जात आहे. मात्र, त्यामुळे आपल्या मुलांच्या संपूर्ण आयुष्यावर काय परिणाम होईल, याचे गांभीर्य या जोडप्यांना दिसत नाही. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी संवाद व समुपदेशनाचा पर्याय स्वीकारणे आवश्‍यक आहे. 

सातारा - गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात कौटुंबिक वादातून घडणाऱ्या हत्या व आत्महत्यांच्या घटना पाहता मृत्यूला कवटाळणं इतकं सोपं व्हावं..? असा प्रश्‍न साहजिकच निर्माण होतो. कौटुंबिक वाद कोणत्याही प्रकारचा असो, त्यावर तोडगा नाहीच असे होऊ शकत नाही. मात्र, परस्परांतील संवादाचा अभाव, शांतपणे तोडगा काढण्यासाठी अपुरा संयम यामुळे टोकाची भूमिका उचलली जात आहे. मात्र, त्यामुळे आपल्या मुलांच्या संपूर्ण आयुष्यावर काय परिणाम होईल, याचे गांभीर्य या जोडप्यांना दिसत नाही. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी संवाद व समुपदेशनाचा पर्याय स्वीकारणे आवश्‍यक आहे. 

पतीने धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना काल महाबळेश्‍वर येथील एका हॉटेलमध्ये समोर आली. अवघ्या 11 वर्षांच्या आपल्या मुलासमोरच हे कृत्य झाले होते. तशीच घटना मागील महिन्यात सज्जनगड परिसरात झाली. पूर्व प्रियकरासोबत एका विवाहितेने गडाच्या कड्यावरून उडी मारून जीवन संपवले. या वेळीही त्या विवाहितेचा लहानगा मुलगा गडावरच होता. त्याच्याच समोर त्यांनी उडी मारली होती. आई गडावरून पडली एवढेच तो सांगत होता. हत्या, आत्महत्या म्हणजे काय हे समजतही नाही, त्यांच्यासमोर होणाऱ्या या प्रकारांचा मनावर किती मोठा आघात होऊ शकतो याची कल्पनाच न केलेली बरी. संपूर्ण आयुष्यभर ही भळाळती जखम त्यांना वागवावी लागणार. त्याचबरोबर दोन्ही कुटुंबीयांनाही हा धक्का सहजासहती पचवता येणारा नसतो. हत्या, आत्महत्यांच्या माध्यमातून जीवनयात्रा संपविण्याचं हे लोण हे सामाजिकदृष्ट्या निश्‍चितच अत्यंत गंभीर असे आहे. 

हत्या- आत्महत्यांची कारणे बदलताहेत 
महिलेला समाजाने नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक देत तिचा वारंवार छळ करून तिच्यावर अत्याचार केला आहे. काही वर्षांपूर्वी हुंड्यासाठी, तसेच वेगवेगळ्या कारणांसाठी विवाहितेचा छळ केला जात होता. त्यातून महिलांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले होते. आता हुंडा व पुत्रप्राप्तीसाठीच्या छळाच्या व त्यातून होणाऱ्या आत्महत्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, उंचावलेल्या अपेक्षा व विवाहबाह्य संबंधांमुळे संसार उद्‌ध्वस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांचा बाहेरख्यालीपणा अथवा अगदी विवाहित महिलाही एकटेपणा दूर करण्यासाठी वेगळ्या मार्गाला लागून त्यातून आत्महत्यांचे प्रकार वाढू लागले आहेत. 

कौटुंबिक संवाद हरवतोय 
एकत्र कुटुंब पद्धतीची जागा विभक्त कुटुंबांनी घेतली आहे. त्याही कुटुंबात सर्व आपापल्या दिनचर्येत व्यस्त. एकमेकांशी बोलायला वेळ नाही. जो काही वेळ मिळतो, तो एकतर टीव्हीसमोर, अन्यथा स्मार्ट फोनच्या स्क्रीनमध्ये खर्च होतो. एकूणच या स्थितीमुळे कुटुंबातील सदस्यांचा परस्परांशी संवादच संपलाय. एवढंच काय, तर आपल्या मुलांमध्ये काही बदल होताहेत, त्यांची मानसिकता व वर्तणूक बदलतेय हे बघण्यासाठीही पालकांकडे वेळ नसल्याची स्थिती आहे. आधुनिक साधनांचा स्वीकार होतोय, मात्र, त्यातून वाढणाऱ्या मैत्रीवर शंका निर्माण होत आहेत. त्यामुळे परस्परातील प्रेम, विश्‍वास हरपत चालला आहे. चिडचीड वाढत जाते. त्याचा परिणाम नकारात्मक मानसिकतेवर होतो. दुसरीकडे आधार शोधण्यात होतो. त्यातून अशा क्रूर घटना समोर येत आहेत. 

असे असू शकतात उपाय 
- कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढविणे 
- त्यांच्याशी संवाद वाढवून समस्या जाणून घेणे 
- तणाव दूर करण्यासाठी समुपदेशन 
- तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रबोधन करणे 
- संस्था, संघटनांनी प्रबोधनपर कार्यक्रम घेणे 

रज संवाद, समुपदेशनाची 
प्रत्येक कौटुंबिक वादावर तोडगा निघू शकतो. त्यासाठी गरज आहे, संवाद व समुपदेशनाची. महिला आयोगाच्या समुपदेशन केंद्रात वादाची कारणे समजून ती मुळापासून काढण्याचे प्रयत्न होतात. परस्परांतील व कुटुंबातील संवाद वाढविला जातो. त्यातून नक्कीच मार्ग निघतो. नाही निघाला तरीही कायदेशीरमार्गे एकमेकांपासून विभक्त होता येतेच. हाच मार्ग सर्वांनी स्वीकारला पाहिजे. कोणताही वाद हा आयुष्यापेक्षा मोठा असूच शकत नाही. त्याचबरोबर स्वत:पेक्षा मुलांच्या आयुष्याचाही विचार करणे आवश्‍यक आहे. 
ऍड. मनीषा बर्गे, सदस्य, राज्य महिला आयोग 

भावनिक आरोग्याचे दुर्दैवी टोक 
काल महाबळेश्‍वर येथे घडलेली घटना म्हणजे भावनिक आरोग्याचे एक भीषण आणि दुर्दैवी टोक आहे. राग, वैफल्य, ताण यांसारख्या भावना सर्वांनाच असतात; पण त्याचे नियमन करण्याची क्षमता सर्वांकडे नसते. काही जण ही क्षमता गमावून बसतात. छोट्या- मोठ्या घटनांतून समाजाचे खूप नुकसान नेहमीच होत आहे. सर्वांनीच भावनिक आरोग्याची जोपासना जबाबदारीने करण्याची गरज पुन:पुन्हा अधोरेखित होत आहे. 
डॉ. अनिमिष चव्हाण, मानसोपचार तज्ज्ञ 

Web Title: It is so easy to die