हे ग्रेटच.. :इथे रोज तयार होतायत 1300 डबे 

IS320A03813.jpg
IS320A03813.jpg

इस्लामपूर  (सांगली) : जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गाने सर्वसामान्य, हातावरचे पोट असणारे, ज्यांच्या राहण्या-खाण्या-पिण्याची भ्रांत आहे असे आणि परप्रांतातून पोट भरण्यासाठी स्थलांतरित झालेल्या अनेकांचे जगणे हराम बनले आहे. इस्लामपुरात 'माणुसकीचं नातं' तयार झाले आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कोरोनाच्या संकटाने ज्यांना 'निराधार' बनवले आहे अशांसाठी रोज सकाळ, संध्याकाळ जेवणाचे 1300 डबे तयार होत आहेत.

त्याचे दोन्ही वेळेला सोशल डिस्टसिंगच्या आधाराने वाटप होत आहे. यासोबतच फळे, भाज्या, जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप होत आहे ते वेगळेच! या उपक्रमाने इस्लामपुरात वंचितांना 'माणुसकीच्या भिंती'चा आधार मिळाला आहे, हे मात्र नक्की! 
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अचानक देश लॉकडाऊनची घोषणा झाली आणि ज्यांच्यापर्यंत हे का, कशासाठी सुरुय हेच समजले नाही, ते मात्र अडकून पडले. जेव्हा समजले तेव्हा वेळ निघून गेलेली. सगळीकडून कोंडी झालेली! त्यांना ना निवाऱ्याची व्यवस्था करता आली ना पोटापाण्याची! या स्थितीत जे लोकांकडे नेहमीच संशयाने पाहतात असे आपण ज्यांना म्हणतो त्या खाकी वर्दीतल्या पोलिसांच्या हृदयाला पाझर फुटला.

अन्नापाण्यासाठी लोक तडफडतायत आणि आपण कायदा, सुव्यवस्था राबवित आहोत याची प्रकर्षाने जाणीव झालेल्या पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना अस्वस्थ केले. कोरोनाने निर्माण केलेली दहशत, दाहक परिस्थिती, जबाबदारी आणि मर्यादा याचे भान बाळगून श्री. पिंगळे यांनी मनातली खदखद सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव यादव यांना बोलून दाखवली. त्यांच्यापासून पहिली वीट जी सहज रचली गेली आणि त्यातून आज शहरात एक अवाढव्य भिंत उभी राहिली आहे. सुरवातीला शंभर, मग दीडशे, दोनशे असे करत आज सुमारे 650 लोकांच्या आधारासाठी ही भिंत उभीय.

श्री. पिंगळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शेकडो उदारमतवादी, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, शेतकरी आपापल्या परीने या उपक्रमात सहभागी होतायत. स्वतःहून मदत देतायत. पोलीस यंत्रणेतील काही सहकारी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळून अहोरात्र कष्ट घेत आहेत. केवळ जिल्हा, राज्यच नव्हे तर संपूर्ण देशात या उपक्रमाची दखल घेतली जावी, अशा पद्धतीने काम सुरू आहे. 

माणुसकीचं लॉकडाऊन नाही अजून..! 
माणुसकीचं लॉकडाऊन नाही अजून..! या उपक्रमाचा लाभ इस्लामपूर शहरातील झोपडपट्टी परिसर, राजेबागेश्वर परिसर, कर्मवीरनगर, रिंगरोड, क्रांतिसिंहनगर, डवरीगल्ली, औद्योगिक वसाहत परिसर, पेठ-वाघवाडी रस्त्यावरील तसेच आजूबाजूचे परप्रांतीय, तिरंगाचौक, तेवरेकॉलनी, कोळीमळा, लमाणतांडा, विष्णूनगर, वाघवाडीफाटा या ठिकाणच्या लोकांना आधार मिळत आहे. 

पोलीस-माणसांत आपुलकीचे नाते! 
एरवी पोलिसांशी कधीच संपर्क न येणारे किंवा त्यांच्याविषयी भीती बाळगून असणारे लोक या उपक्रमाच्या निमित्ताने पोलिसांमधली माणुसकी अनुभवत आहेत, तशा समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com