विठ्ठलाची भेट भक्तांसाठी खडतरच

road
road

करकंब (ता.पंढरपूर, जि. सोलपूर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीच्या विठुरायाची आषाढी वारी जेमतेम एक महिन्यावर येवून ठेपली आहे. मात्र सध्या चालू असलेल्या पंढरपूर-टेंभूर्णी मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वारीसाठी मराठवाड्यातून येणाऱ्या लाखो भाविकांचा पंढरपूर तालुक्यातील प्रवास मात्र अतिशय खडतर ठरणार आहे. 

पंढरपूर-टेंभूर्णी राज्यमार्गाचे राष्ट्रीय मार्गात रुपांतर करुन याच्या दुरुस्तीचे काम गेल्या वर्षभरापासून चालू आहे. त्यातही सोलापूर-पूणे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या वेणेगावपासून भोसे हद्दीतील दिवाळ मळ्यापर्यंत केवळ डांबरीकरण तर दिवाळमळ्यापासून गुरसाळेपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणासह सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यापैकी वेणेगावपासून करकंब पर्यंतचे डांबरीकरण पूर्ण झाले असले तरी करकंब ते दिवाणमळ्यापर्यंतचे सुमारे सात किलोमीटरचे काम बाकी आहे.

शिवाय चालू असलेल्या सिमेंटकाँक्रिटीकरणाच्या कामासाठी दोन्ही बाजूंनी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे वाहने चालविताना हा मार्ग धुळीने माखला जातो तर पाऊस पडल्यावर या मार्गावर दलदल निर्माण होते. परिणामी वाहने चालविताना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागतो. विशेषतः दुचाकी चालकांची चांगलीच तारांबळ होत आहे. रस्ता खोदल्यानंतर त्याचे मुरमीकरण व सपाटीकरण करणे आवश्यक असताना सपाटीकरण न झाल्याने हा मार्ग अक्षरशः खाचखळग्यांचा बनला आहे. आज या मार्गावरुन जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागत असताना अगदी महिन्यावर येवून ठेपलेल्या आषाढी वारीतील भाविकांचा प्रवासही तितकाच खडतर राहणार आहे. शिवाय या रस्त्याच्या दुतर्फा असणारी मोठी झाडे तोडली असल्यानेही भाविकांच्या त्रासात भरच पडणार आहे. 

विशेषतः याच मार्गावरुन मराठवाड्यातील पैठण, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, पाथर्डी, मुक्ताईनगर, खुलताबाद, श्रीक्षेत्र देवगड, आदी ठिकाणच्या मानाच्या पालख्यांसह शेकडो दिंड्यांचा प्रवास होत असतो. आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांपैकी निम्म्याहून अधिक भाविक याच मार्गावरुन येतात. शिवाय शेगाव येथिल संत गजानन महाराज पालखीचा परतीचा प्रवासही याच मार्गावरुन होत असतो. असे असताना गेल्या वर्षभरापासून चालू असणारे हे काम प्रशासनाला आषाढी वारीचा विचार करुन त्यापूर्वी का संपविता आले नाही, असा प्रश्न भाविकांमधून उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com