‘सकाळ’च्या ‘जगणं लाईव्ह’ दिवाळी अंकास प्रथम पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

एक नजर

  • दिवाळी अंकाच्या विश्‍वात अभिनव प्रयोग म्हणून नोंदलेल्या ‘सकाळ’ कोल्हापूर आवृत्तीच्या ‘जगणं लाईव्ह’ दिवाळी अंकास  प्रथम पुरस्कार जाहीर
  • पुणे येथील दिनमार्क पब्लिकेशन्सच्यावतीने घेण्यात आलेल्या छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत हा पुरस्कार.
  • उत्कृष्ट छपाई, सादरीकरण व विषयांची निवड यासाठी ‘जगणं लाईव्ह’ला स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल प्रथम पुरस्कार 

कोल्हापूर - दिवाळी अंकाच्या विश्‍वात अभिनव प्रयोग म्हणून नोंदलेल्या ‘सकाळ’ कोल्हापूर आवृत्तीच्या ‘जगणं लाईव्ह’ दिवाळी अंकास पुणे येथील दिनमार्क पब्लिकेशन्सचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. पब्लिकेशन्सच्या वतीने आयोजित छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘जगणं लाईव्ह’ला उत्कृष्ट छपाई, सादरीकरण व विषयांची निवड यासाठी स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल प्रथम पुरस्कार मिळाला आहे. आज (ता. २२) प्रसिद्ध गीतकार कवी प्रवीण दवणे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सभागृहात पारितोषिकांचे वितरण होणार आहे.

या दिवाळी अंकात एकूण २८ रिपोर्ताज आहेत. ‘सोयरी वनचरे’ या पहिल्या विभागात मगर, हत्ती, गवा यांच्या मागावर राहून बातमीदारांनी या प्राण्यांमुळे भयभीत झालेलं माणसांचं जगणं मांडलं आहे. शिवाय या विभागातच ‘कोकणवाटा’, ‘जंगल सफारी’, ‘डोंगरातले मधपाळ’ असे विषयही आहेत. 

जगण्याशी झुंजणाऱ्या माणसांना भेटवणारे रिपोर्ताज ‘माणसाचे गाणे गावे’ या विभागात वाचायला मिळतात. यात ‘दुष्काळाशी भिडणारी माणदेशी माणसं’, ‘मच्छीमार नौकेत अनुभवलेली रात्र’, ‘अंबाबाईच्या मंदिराभोवती पोट भरणारे लोक’, ‘वर्षानुवर्षे स्मशानात काम करणारे कर्मचारी’,  ‘सीमाभागात गुण्यागोविंदाने नांदणारे मराठी-कानडी बांधव’, ‘वंशावळी जपून ठेवणारा कर्नाटकातील हेळवी समाज’, ‘कोकणात रुजलेले परप्रांतीय’ आदी विषय हाताळलेले आहेत.

विषयांना थेट भिडून केलेल्या मांडणीमुळे आणि सोप्या भाषेमुळे हे रिपोर्ताज ‘लाईव्ह’ झाले आहेत. तसेच त्यांना संदर्भमूल्यही प्राप्त झाले आहे. या सर्व रिपोर्ताजचे व्हिडिओ यू ट्यूबवर #JaganeLive हा ‘हॅश टॅग’ देऊन पाहायला मिळतील.

Web Title: Jagane Live Diwali issue wins first award