#Jaganelive काजू प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांची यशोगाथा

सुनील कोंडुसकर
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

जगणं लाईव्‍ह!
प्रत्येक बातमीच्या मागे असते एक कहाणी. सुख-दु:खाच्या या ‘लाईव्ह’ कहाण्या शोधून आमच्या बातमीदारांनी यंदाच्या दिवाळी विशेषांकात ‘रिपोर्ताज’ स्वरूपात सविस्तर मांडल्या. दिवाळी अंक तुमच्या हातात पडण्यापूर्वी रोजच्या अंकात बातम्यांच्या रूपात या कहाण्यांचे ‘ट्रेलर’ आम्ही देणार आहोत. अर्थात खरी मेजवानी मिळेल, ‘सकाळ दिवाळी २०१८’च्या विशेषांकात...

पांढरं सोनं अर्थात काजू हे तसं श्रीमंतांचं खाद्य. दिवाळी, तसेच इतरवेळीही सुक्या मेव्‍याच्‍या तबकात काजूगराला हक्‍काचं स्‍थान. जरी हे सोनं सुखवस्‍तू कुटुंबांतून मिरवत असलं, तरी त्‍याच्‍या निर्मितीपाठीमागं अनेक कष्‍टकरी महिलांचे हात गुंतलेले आहेत. या  महिला चंदगड, आजरा तालुक्‍यांतील अनेक काजूप्रक्रिया उद्योगांचा कणा बनल्‍या आहेत. यातून त्‍यांनाही जगण्याचं साधन, तसेच आत्मविश्‍वास आणि आत्मभान मिळालं आहे. त्‍यांच्‍या कुटुंबालाही यामुळं आधार मिळालाय...

‘‘आज मला लवकर परत येऊस पाहिजे बाई!’’ ‘‘का?’’ ‘‘आज म्हाळ नव्ही?’’ पाटणे (ता. चंदगड) येथून चंदगडला काजू कारखान्यात मजुरीला जाणाऱ्या महिलांचा हा संवाद स्त्रीचे स्त्रीपण स्पष्ट करणारा. कुटुंबात पुरुषांची मक्तेदारी अजूनही कमी झालेली नाही हेच दाखवणारा. घरकाम, शेतकाम, मजुरी तर तिने करायचीच. परंतु, सण, उत्सव, परंपराही तिनेच जोपासायच्या हे दर्शवणारा. गाडी पाटणेतून जेलुगडे गावच्या चौकात येते.

काही वेळ थांबते. आज इथेही म्हाळामुळे मजुरांची संख्या रोडावलेली आहे. त्यांचे बोलणे, शरीरयष्टी, पेहराव यातून गरिबी दिसते. चंदगड व आजरा तालुक्‍यात सुमारे दीडशे उद्योगांत काम करणाऱ्या सुमारे चार हजार महिला मजुरांची ही स्थिती; पण या उद्योगाने महिलांना जगण्याचे साधन दिले तसेच आत्मविश्‍वास आणि आत्मभानही.

सकाळी नऊ ते सायंकाळी सहा अशी कामाची वेळ; परंतु घरकामासाठी पहाटे चारलाच दिवस सुरू होतो व रात्री दहा वाजता संपतो. सहा वाजता कामावरून सुटले की, घरात पोहोचायला सायंकाळचे सात वाजतात. रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. जेवण झाले की भांडी, कपडे धुणेही रात्रीच उरकायचे. तोपर्यंत रात्रीचे नऊ-साडेनऊ वाजलेले असतात. उद्याच्या डब्याची तयारी आता केली तरच पहाटेचा वेळ वाचतो. भाजी, कडधान्य, तांदूळ नीट करून ठेवायचे. पहाटे चारला उठले की पुन्हा जेवण बनवायचे. स्वतःचा डबा भरून घ्यायचा.

मुलांच्या आणि कुटुंबातील इतरांच्या जेवणाचे नियोजन लावायचे. मुलांचे शिक्षण, कुटुंबातील व्यक्तींचे आजारपण हे सर्व मनात साठवून कामावर हजेरी लावावी लागते. तरच चूल पेटते. आठवड्याचे सहा दिवस हे रुटीन सुरू राहते. एक दिवस सुट्टीचा मिळतो. त्या दिवशी आठवड्याचा बाजार करायचा. पाहुणे, नातेवाईकांना भेटायचे असेल तर हाच दिवस. 

काजू कारखान्यांनी महिलांना बारमाही रोजगार दिला. पगारही चांगला मिळतो; मात्र अजूनही या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित आहे. विधवा, परित्यक्ता, गरीब, भूमिहीन कुटुंबातील महिलाच प्राधान्याने पाहायला मिळतात. सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला, मुली इकडे येत नाहीत. त्यांना त्यात कमीपणा वाटतो.

लग्नाचा खर्च अन्‌ मुलांचे शिक्षण पूर्ण
उच्चशिक्षित असूनही गरिबीमुळे काम करणाऱ्या व अल्पशिक्षित तरुण मुली मनापासून काम करतात. समूहात काम केल्यामुळे वागण्या, बोलण्यात आत्मविश्‍वास आला आहे. काही मुली चार-पाच वर्षांत स्वतःच्या लग्नासाठीचा एखादा खर्च पार पडेल एवढी रक्कम उभी करतात. अनेक महिलांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे.

नवऱ्याने सोडल्याने दोन मुलांसह माहेरी राहताना अपराधीपणा वाटायचा. उच्च शिक्षण असले तरी नवऱ्याने सोडलेली म्हणून समाजाचा दृष्टिकोन चांगला नव्हता. काजू कारखान्यात मजुरी करून दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मुलगा नोकरीला लागला व दिवस पालटले; मात्र त्याचा पाया काजू कारखान्यामुळे घातला याचा अभिमान आहे.
- सुलोचना पाटील,
काजू कारखान्यातील मजूर

आपण नोकरी करायची नाही तर इतरांना द्यायची, असा संदेश वडिलांनी दिला. कर्नाटकातून चंदगडला येऊन मी तीस वर्षांपूर्वी काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. सर्वसामान्य, गरीब, आर्थिक दुर्बल, सामाजिकदृष्ट्या हेटाळलेल्या महिलांचा प्रपंच उभारण्यासाठी हातभार लावू शकलो, याचे समाधान आहे.
- भास्कर कामत, 

अध्यक्ष महालक्ष्मी काजू कारखाना, चंदगड

Web Title: Jaganelive Kolhapur Sakal Diwali Article On cashew nut processing worker

टॅग्स