#Jaganelive ‘हत्ती कॅम्प’चा प्रस्ताव धूळ खात

#Jaganelive ‘हत्ती कॅम्प’चा प्रस्ताव धूळ खात

जंगली हत्तीचा उपद्रव रोखण्यासाठी आजरा तालुक्‍यातील घाटकरवाडी येथे हत्ती कॅम्प (हत्ती संगोपन केंद्र) उभारण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबतचा प्रस्ताव या विभागाने राज्याचे प्रधान वनसंरक्षक नागपूर येथील कार्यालयाकडे पाठवून दीड वर्षाचा काळ लोटला तरी त्याबाबत अद्याप हालचाली झालेल्या दिसत नाहीत. पाळीव हत्तीचे राज्यात अनेक ठिकाणी हत्ती कॅम्प आहेत. पण जंगली हत्तीचा हा राज्यातील पहिलाच कॅम्प ठरणार असल्याचे सांगण्यात येते.

कर्नाटकातून आलेले हत्ती गेली १५ वर्षे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, पन्हाळा परिसरात आणि आजरा तालुक्‍यात प्रत्येकी एक टस्कर हत्ती आहे. तर चंदगड तालुक्‍यात हत्तीचा कळप वारंवार येऊन पिकांची नासधूस करत आहे. या १५ वर्षांत हत्तींनी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. आजरा तालुक्‍यात १२ वर्षांत हत्तीकडून एक कोटी रुपयांचे पीक नुकसान झाले असून त्याची नुकसान भरपाईही वनविभागाने शेतकऱ्यांना दिली आहे.

आजऱ्यात हत्तीच्या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले. हत्तींचा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढता उपद्रव लक्षात घेता वनविभागाकडून हत्ती कॅम्पचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी तिलारीनगर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या काही जागांची पहाणी करण्यात आली. यामध्ये घाटकरवाडी येथील जागा वनविभागाने निश्‍चित केली आहे. घाटकरवाडी प्रकल्पालगत असलेली १६ हेक्‍टर जागेवर हत्ती कॅम्प उभारण्याचे नियोजन आहे.

राज्यात ताडोबा, मेळघाट, गडचिरोली येथे पाळीव हत्तीचे कॅम्प आहेत. वनविभागाचे कामे करण्यासाठी आणि पर्यटकांच्या जंगल सफारीसाठीची कामे हत्तींना दिली जातात. पण जंगली हत्तीचा घाटकरवाडी येथे राज्यातील पहिलाच हत्ती कॅम्प असेल. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून याबाबतचा निर्णय शासन दरबारी होऊ शकतो.

उपद्रवी हत्ती पकडण्यासाठी निधी कधी ?
उपद्रवी हत्ती पकडायला ६६ लाखांचा खर्च येतो. यासाठी कर्नाटकातून प्रशिक्षित हत्तीची टिम बोलावण्यात येणार आहे. याबाबतही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पण निधीअभावी कोणतीही हालचाल दिसत नाही.

दररोज नुकसान
आजरा तालुक्‍यात तर टस्कर हत्तीकडून दररोज पिकांचे नुकसान होत आहे. कापणीला आलेल्या भात पिकात टस्कर येऊन धुडगूस घालत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com