#Jaganelive पंत अमात्य बावडेकर घराण्याने जपलाय समृद्ध ऐतिहासिक ठेवा

#Jaganelive  पंत अमात्य बावडेकर घराण्याने जपलाय समृद्ध ऐतिहासिक ठेवा

कोल्हापूर आणि परिसरातील अनेक इतिहासप्रसिद्ध घराण्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठेशाहीचा झेंडा फडकवत ठेवला. आजही या घराण्यांनी मराठेशाहीचे वैभव जपून ठेवले आहे. सामाजिक कामांमध्ये सहभाग घेत समाजाशी नाळ कायम ठेवली आहे. अशा या घराण्यांची सविस्तर माहिती ‘जगणं लाईव्ह’ या यंदाच्या दिवाळी अंकातून देत आहोत. त्यापूर्वी काही निवडक घराण्यांनी जपलेल्या वैशिष्ट्यपूर्ण ठेव्यांची ही ओळख...

इतिहासातील कर्तृत्ववान घराणे म्हणून उल्लेख असलेल्या पंत अमात्य बावडेकर घराण्याबद्दल आजही आदराचे स्थान आहे. अडीच सेंटिमीटरची भगवद्‌गीता, चार सेंटिमीटरची हनुमानचालिसा, शिरपेच, हत्तीची झूल, हस्तीदंती गणपती ते रामदास स्वामींनी दिलेले रघुवीरयंत्र अशा ऐतिहासिक ठेव्याने ते समृद्ध आहे. पळसंबे (ता. गगनबावडा) येथील वाड्यातील जुन्या वस्तूंचा खजिना गतकाळ उभा करणारा आहे. बावडेकर कुटुंबीयांनी इतिहासाशी नाते घट्ट करीत सामाजिक कार्याचा वसाही जोपासला आहे. 

शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात बावडेकरांचे निवासस्थान आहे. घराण्याचे वंशज नीलराजे बावडेकर घराण्याचा इतिहास पुढील पिढीला कळावा, यासाठी आग्रही आहेत. जगण्यात साधेपणा असल्याने इतिहासात ठसा उमटविलेल्या या घराण्याबद्दल उत्सुकता आहे. छोट्या पेटीतील दोन इंच भगवद्‌गीता, तीन इंच हनुमानचालिसा पाहताना त्याच्या जपणुकीत बावडेकर यांनी घेतलेली काळजी लक्षात येते.

पाच पिढ्यांना जोजविणारा लाकडी पाळणा 
पळसंबेतील वाड्यातील २५ पैकी नऊ खोल्यांत वस्तुसंग्रहालय आहे. बावडेकरांच्या पाच पिढ्यांना झुलविणारा लाकडी पाळणा वाड्यात आहे. बावडेकर घराण्याच्या अधिपत्याखाली गगनबावडा जहाँगिरीचा कारभार होता. त्याच्या खाणा-खुणा वाडा देतो.

एक इंच भगवद्‌गीता वाचण्यासाठी भिंग वापरावी लागते. हे छोट्या आकाराचे ग्रंथ शतक-दीड शतकापूर्वीचे असावेत, असा अंदाज ते बांधतात. सण-समारंभात फेट्यांवर मोत्यांचा शिरपेच लावून बावडेकर लक्ष वेधून घेतात. घरातील भिंतींवर हत्तीची झूल, तर कपाटात जुने शिक्के आहेत. बावडेकरांच्या पळसंबेतील वाड्यातील खजिना डोळे दीपविणारा ठरतो.

बावडेकरांचे पूर्वज पळसंबेतील वाड्यासमोरील जागेत टेनिस खेळायचे. तेही कोट व धोतर परिधान करून. औषधे करण्याचे खलबत्ते, हंडे ते माईसाहेब बावडेकर यांच्या कार्याची झलक छायाचित्रातून मिळते. तलवारी, पट्टा, तोफ, वीरगळ वाड्याची उंची वाढविणारी आहेत.

पूर्वजांनी गाजविलेल्या कर्तृत्वामुळे आम्हाला सन्मान मिळतो. त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळत राहावा, यासाठी पळसंबेतील वाड्यात जुन्या वस्तूंचे संग्रहालय साकारले आहे. 
- नीलराजे बावडेकर

श्री. बावडेकर यांचा महापालिकेच्या शाळांना दत्तक घेण्याच्या उपक्रमात पुढाकार असून, गगनबावड्यातील जिल्हा परिषदेची शाळा त्यांनी  दत्तक घेतली आहे. ते रेसिडेन्सी क्‍लबचे जॉइंट सेक्रेटरी आहेत. तसेच, रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांत सहभागी होतात. जिवबा नाना पार्कमधील अवनी संस्थेतील विद्यार्थ्यांना आवश्‍यक मदत करतात. माईसाहेब बावडेकर हायस्कूलच्या माध्यमातून त्यांनी स्वत:ला शैक्षणिक क्षेत्रात वाहून घेतले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com