#Jaganelive ‘टॉवर’चा लक्षवेधी वाडा!

संदीप खांडेकर
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

जगणं लाईव्‍ह!
प्रत्येक बातमीच्या मागे असते एक कहाणी. सुख-दु:खाच्या या ‘लाईव्ह’ कहाण्या शोधून आमच्या बातमीदारांनी यंदाच्या दिवाळी विशेषांकात ‘रिपोर्ताज’ स्वरूपात सविस्तर मांडल्या. दिवाळी अंक तुमच्या हातात पडण्यापूर्वी रोजच्या अंकात बातम्यांच्या रूपात या कहाण्यांचे ‘ट्रेलर’ आम्ही देणार आहोत. अर्थात खरी मेजवानी मिळेल, ‘सकाळ दिवाळी २०१८’च्या विशेषांकात...
#Jaganelive #KolhapurSakalDiwali 

कोल्हापूर - मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एकमेव टॉवर असलेला वाडा पाटणकर कुटुंबीयांचा. तंजावरमधील चिनी कलाकृतीच्या प्लेट, चहाचे भांडे, चांदीचा मोर यांसारख्या आणखी किती जुन्या वस्तू येथे असतील, असे कुतूहल नक्कीच जागे होते. आठ हजार स्क्वेअर फूट जागेत बांधलेल्या वाड्यावर नजर जरी भिरभिरली, तरी त्याची जपणूक पाटणकर कुटुंबीयांनी किती उत्तम तऱ्हेने केली आहे, याची जाणीव होते.

जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर हे नाव उच्चारताच सहा फूट उंच, गोरा वर्ण, धारदार नाक, अंगात पांढरा सदरा व विजार असे व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते. जगण्यात ‘डाऊन टू अर्थ’ तत्त्वाला आपलेसे करणाऱ्या श्री. पाटणकर यांच्या आई तंजावरच्या राजकन्या. विवाहानंतर त्या कोल्हापूरकर झाल्या. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील पाटणकर यांच्या वाड्यात त्या तंजावरच्या काही कलाकृतींसमवेत दाखल झाल्या.

तंजावरमधील सुर्वे कुटुंबीयही त्यांच्यासमवेत आले. टॉवरमुळे पाटणकर यांचा वाडा नेहमीच चर्चेत राहिला. तो १९०७ रोजी बांधला गेला. एकशे दहा वर्षे पूर्ण केलेल्या कौलारू वाड्यातील काचेचा हॉलही उत्सुकतेचा विषय आहे. एकमजली वाड्यावर पाटणकर जहागिरीचे चिन्ह असून, सरदार भीमराव पाटणकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. वाड्यातील जुन्या वस्तू लक्ष वेधणाऱ्या आहेत. शहरातून कोठूनही टॉवर दिसायचा, असे पाटणकर आवर्जून सांगतात.

तंजावरहून आणलेल्या चिनी कलाकृतींवर सुंदर नक्षीकाम आहे. चांदीचे झाड, अगरबत्तीचे झाड, चांदीचा बुद्धिबळाचा सेट आदी त्यांच्यातील समृद्धतेचे प्रतीक आहेत. घरातील अन्य छोट्या-मोठ्या वस्तू व भांडी सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची आहेत. काही इतकी जुनी आहेत, की त्यांचे वर्ष सांगणे कठीण आहे. पाटणकर मूळचे पाटणचे (जि. सातारा) येथील असल्याने तेथे त्यांचा मोठा वाडा आहे. सहा बुरुज असलेला हा वाडा आजही पर्यटकांना खुणावणारा ठरतो आहे. 

बाळ पाटणकर म्हणतात, ‘‘तंजावरमधून जशा काही वस्तू आमच्या घरी आल्या. तसे पदार्थ बनविण्याच्या नव्या पद्धतीही आल्या. आमच्या आई हयात असेपर्यंत सुंठीगोळे, दहीमांस, मासे व मटणाचे लोणचे घरी बनविले जात होते.’’

बहुजनांसाठी शाळा
बाळ पाटणकर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ३२ वर्षे अध्यक्ष राहिले आहेत. अरुण नरके फाउंडेशनचेही ते अध्यक्ष असून, त्यांनी पुण्यातील वाडियार लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. रंकाळा स्टॅंडकडून रंकाळा तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर नागोजीराव पाटणकर हायस्कूलची इमारत आहे. तोच त्यांचा मूळ वाडा. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी शाळेची स्थापना करण्यात आली.

Web Title: Jaganelive Kolhapur Sakal Diwali Article On Patankar House